आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणांच्या मूळ उद्देशालाच हरताळ, जिल्ह्यातील शेती उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- सलग दोन वर्षे दुष्काळात होरपळलेल्या नगर जिल्ह्याला आणखी गर्तेत ढकलण्याचा प्रयत्न सरकारी धोरणातून होत आहे. दुष्काळात पिचलेल्यांची शेती उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान समन्यायी पाणीवाटपात पुढे आले आहे. पर्जन्यछायेच्या दुष्काळी क्षेत्राच्या सिंचनासाठी जिल्ह्यात जायकवाडीपूर्वी धरणे बांधण्यात आली. धरणांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याने यंदा सिंचनासाठी जिल्ह्यात पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. समन्यायी धोरणाच्या नावाखाली जिल्ह्यातील ३३ टक्के उपयुक्त पाणी मराठवाड्याकडे पळवण्यात येत आहे.

गेल्या पाचपैकी तीन वर्षे जिल्ह्याने दुष्काळाला तोंड दिले. सन २०१२ २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस पडला. गेल्यावर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळाचे चटके अधिक सोसावे लागत आहेत. यंदाही पावसाभावी जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली. खरिपाची पिके धाेक्यात असताना मुळा, भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातून आवर्तनाची मागणी झाली. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखीव ठेवण्यात आल्याचे सांगत मुळातून आवर्तन मिळाले नाही, तर भंडारदरा धरणातून उशिरा आवर्तन सोडण्यात आले. यंदाही आतापर्यंत सरासरीच्या ७८.९० टक्के पाऊस झाला आहे. सलग दुष्काळाने संकटात सापडलेल्या जिल्ह्याला आणखी संकटात टाकण्याचा प्रयत्न गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सरकार करत असल्याची भावना तीव्र होत आहे.

जायकवाडीसाठी एकूण १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. यातील ८.२४ टीएमसी नगर जिल्ह्यातील धरणांतून, तर उर्वरित पाणी नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सोडण्यात येणार आहे. मुळा धरणातून १.७४, तर भंडारदरा निळवंडे धरणातून ६.५० टीएमसी पाणी देण्याचे आदेश आहेत. नगर जिल्ह्यातील संबंधित धरणांत सध्या २८ हजार ६०० दशलक्ष घनफूट (२८.६ टीएमसी) साठा आहे. यातील मृतसाठा वगळता जवळपास २४ टीएमसी उपयुक्त पाणी शिल्लक राहते. उपयुक्त पाण्यापैकी ८.२४ म्हणजेच ३३ टक्के पाणी जायकवाडीला देण्यात येणार आहे.

पर्जन्यछायेतील दुष्काळी क्षेत्राला सिंचनाचा लाभ व्हावा, या उद्देशाने मुळा भंडारदरा धरणांची निर्मिती झाली. मात्र, समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली धरणांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरीप आवर्तनाला मुकलेल्या लाभक्षेत्राचा रब्बी हंगामही या निर्णयाने धाेक्यात आला. भंडारदरा, निळवंडे आढळा धरण समूहात सध्या १२ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यातील साडेसहा टीएमसी जायवाडीला सोडल्यास सिंचनासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही. कारण पिण्याचे पाणी, इतर आरक्षण बाष्पीभवनात साडेचार टीएमसीपेक्षा अधिक पाणी खर्च होईल. मुळा धरणात १५.५ टीएमसी पाणी आहे. यातील ४.५ टीएमसी मृतसाठा, पिण्याचे पाणी, उद्योग, कृषी विद्यापीठ, बाष्पीभवनात ४.५ टीएमसी पाणी खर्च होईल. जायकवाडीसाठी १.७४ टीएमसी पाणी सोडल्यास सिंचनासाठी ४.५ टीएमसी पाणी शिल्लक असेल. यातून पूर्ण क्षमतेने एकही आवर्तन होणार नाही. एकूणच जिल्ह्यातील शेती उद््ध्वस्त करण्याचा डाव समन्यायी पाणीवाटपात पुढे येत आहे.

वांबोरी चारी राहणार कोरडी
मुळाधरणातून जायकवाडीला पाणी सोडल्यास वांबोरी चारी कोरडीच राहील. या चारीचा फुटव्हाॅल्व १४ टीएमसी पाणीसाठ्यावर (स्पिलवे) आहे. जायकवाडीला पाणी सोडल्यास मुळाचा साठा १४ टीएमसीपेक्षा खाली जाईल. परिणामी या चारीतून पाणी देण्याचा प्रश्नच उद््भवणार नाही. त्यामुळे लाभक्षेत्रावर अन्याय होणार आहे.

एकत्रित लढा आवश्यक
जिल्ह्यातीलधरणांमधून खरीप आवर्तन टाळून पाणीसाठे पिण्यासाठी राखीव ठेवल्याचे सांगण्यात येत असताना जायकवाडीतून खरिपाचे आवर्तन देण्यात आले. पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीत पुरेसे पाणी असताना नगर जिल्ह्यात अगोदरच कमी असलेले सिंचनाचे पाणी पळवण्यात येत आहे. वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन अन्याय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनीच गट-तट, पक्षभेद विसरून एकत्रित लढा देण्याची आवश्यकता आहे.'' जयप्रकाशसंचेती, निवृत्तकार्यकारी अभियंता.

बागायती शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
उर्ध्वगोदावरी हे अतितुटीचे खोरे आहे. तुटीच्या पाण्याचे वाटप कधीही होत नाही. या खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण झाल्यावरच जायकवाडीला पाणी देण्यासंबंधी विचार होऊ शकतो. पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे नगर, नाशिकमधील नागरिक, जनावरे, शेतकरी आदी समूहाचा समूळ नाश होणार आहे. यंदा खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. रब्बी पिकाचीही शाश्वती नाही. बागायती भागात आतापासूनच पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई भासत आहे. २०१२ पासून गोदावरी कालवे लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही. एका पाण्यावर कोणतेही पीक येत नाही. दारणा गोदावरी समूहातून ३.२४ टीएमसी पाणी काढले जाणार आहे. ते जायकवाडीपर्यंत जाऊच शकणार नाही, तर मग महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरण पाणी सोडण्याचा अट्टहास का करत आहे? जायकवाडीला पाणी सोडून बागायत भागातही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रोत्साहित करीत आहे? -स्नेहलता कोल्हे, आमदार.

महामंडळाकडूनदुजाभाव
दारणागंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसताना या धरणांतील पाणी ब्रिटिश काळापासून सिंचन पिण्यासाठी आरक्षित असतानाही जायकवाडीला पाणी सोडण्याचा घेतलेला निर्णय मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तारक, तर नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांना मारक आहे. जायकवाडीचा २५ टीएमसी मृतसाठा टक्के िंवत्त पाणीसाठा शिल्लक असताना जायकवाडीला पाणी देण्याची गरज नाही. २०१२ मध्ये जायकवाडीत दोन टक्के पाणीसाठ्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन झाले होते. वास्तविक पाच ते सहा हजार अनधिकृत उपसा जलसिंचन योजनांमधून जायकवाडीतील ४० टक्के पाणी चोरून उद्योगधंद्यांसाठी वापरले जात असताना महामंडळाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. सरकारने नवीन पाणी निर्माण करणे सोडून आहे त्याच पाण्यामध्ये नगर, नाशिक जिल्ह्यांतील शेती सार्वजनिक जीवन व्यवस्था उदध्वस्त करण्याचे घेतलेले धोरण अन्यायकारक आहे. -अशोककाळे, माजीआमदार.
मृतसाठ्याचावापर करा
गोदावरीजल आयोगाने जल आराखड्यात उर्ध्व प्रवरा अन्य धरणातील मृत पाणीसाठा विचारात घेतला आहे. मात्र, जायकवाडी धरणात तीस हजार दलघफू मृतसाठा शिल्लक असताना त्याचा विचार समन्यायी पाणीवाटपात केला जात नाही, हे उर्ध्व गोदावरी विशेषतः नगर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे. समन्यायी पाणी धोरण म्हणजे केवळ मराठवाड्याला न्याय इतरांवर अन्याय करणारे कसे काय असू शकते? मुळा, भंडारदरा निळवंडे धरणात सद्यस्थितीत अवघा १२ हजार दलघफू साठा आहे, पण जायकवाडीत याच्या दुप्पट जलसाठा शिल्लक आहे. उलट समन्यायी पाणीवाटपाचा विचार करून मराठवाड्यातील जादा पाणी वरच्या भागाला दिले पाहिजे. वास्तवात तसे करता येणे शक्य होणार नसले, तरी वरच्या धरणांतून जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय अन्यायकारक, अविवेकी एकतर्फी आहे. जायकवाडीतील मृत पाणीसाठा उचलून वापरात आणण्याची आवश्यकता आहे.
-मधुकर नवले, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस कामगार सेल.