आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"मुळा'त सहा महिन्यांसाठी २० टक्केच उपयुक्त पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जानेवारीच्या सुरुवातीलाच नगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील उपयुक्त साठा २० टक्क्यांवर आला आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्याही खाली जाण्याची शक्यता आहे. टंचाई स्थिती लक्षात घेता येत्या सहा महिन्यांकरिता पिण्याचे पाणी उद्योगासाठी धरणात सुमारे चार टीएमसी (४००० दशलक्ष घनफूट) पाणी शिल्लक राहणार आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने यंदा धरणात एकूण क्षमतेच्या ६० टक्केच (१५,६०० दशलक्ष घनफूट) कमाल साठा होऊ शकला. यातील ४,५०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वगळता ५२ टक्के कमाल उपयुक्त साठा धरणात होता. त्यामुळे वारंवार मागणी होऊन, तसेच अडचणीत आलेला खरीप हंगाम वाचवण्यासाठी धरणातून सिंचनाचे पाणी सोडण्यात आले नाही. टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच धरणसाठे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याचा निर्णय त्याचवेळी घेण्यात आला. त्यामुळे मुळा धरणावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांनाही पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागली. त्यातच समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार मुळा धरणातून १७४० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे आदेश आले. त्यानुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुळा धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात अाले. जायकवाडीला १५०० दशलक्ष घनफुटांपेक्षा अधिक पाणी गेल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे पाणी थांबवण्यात आले.

सध्या धरणात हजार ८५० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. यातील मृतसाठा वगळता अवघे २० टक्के उपयुक्त पाणी शिल्लक राहते. त्यातही सिंचनासाठी उजव्या कालव्यातून जवळपास ५५० ते ६०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. डाव्या कालव्यातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी देण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ३००० दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. उजव्या कालव्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. मात्र, टेलच्या भागाला पूर्ण दाबाने पाणीच मिळाले नसल्याच्या तक्रारी कायम आहेत. उजव्या कालव्यातून सिंचनासाठी आणखी पाणी जाणार असल्याने उपयुक्त पाणीसाठा २० टक्क्यांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. आता कुठे जानेवारीला सुरुवात झाली आहे. पावसाळा सुरू होण्यास आणखी साडेपाच ते पावणेसहा महिने बाकी आहेत. त्यातच धरणातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन जुलैच्या मध्यापर्यंत करून त्यादृष्टीने उपाययोजना आखण्यात येतात. धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याने गेल्या अनेक वर्षांतील नीचांक यंदा गाठला आहे.

बाष्पीभवनात अधिक व्यय
मुळाधरणाच्या पाणीसाठ्यातून हिवाळ्यात दररोज जवळपास तीन, तर उन्हाळ्यात पाच दशलक्ष घनफूट पाण्याचा व्यय होतो. यंदा पाणीसाठा कमी असल्याने बाष्पीभवनाचा वेगही अधिक राहण्याची शक्यता आहे. पिण्याचे उद्योगाच्या पाण्यापेक्षाही उपयुक्त पाणीसाठ्यातून बाष्पीभवनात अधिक पाणी खर्च होणार आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाणी टंचाई वाढल्यास मुळाचे पाणी टँकरद्वारे टंचाईग्रस्त भागाला देण्याचा पर्याय सोयीस्कर ठरू शकतो. त्या दृष्टीने आतापासूनच नियोजन हवे.

नगर शहराला चिंता नाही
महापालिकेच्यावतीने शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी वार्षिक ११०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात येते. आरक्षित पाण्यापैकी धरणातून सुमारे ८०० दशलक्ष पाणी वर्षभरासाठी मनपा प्रशासनाकडून उचलले जाते. उद्योगांची गरजही ४०० दशलक्ष घनफूट पाण्यातून भागवली जाते. उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता येत्या जुलैच्या मध्यापर्यंत शहर उद्योगाच्या पाणीपुरवठ्याला कोणताही व्यत्यय येणार नसल्याची स्थिती आहे.