आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समशेरपूरचा पाणीप्रश्न न सोडवल्यास तहसीलसमोर ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - आढळा विभागातील पाणीटंचाईने ग्रामस्थ चिंतेत पडले आहेत. मुथाळणेच्या ग्रामस्थांनी पशुधनासह अकोले तहसील कार्यालयावर नेऊन पाणी व चारा टंचाईची भीषणता प्रशासनासमोर मांडली. सोमवारच्या या आंदोलनानंतर मंगळवारी (1 जुलै) आढळा विभागातील समशेरपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पुन्हा पाणी व चारा टंचाईने डोके वर काढले. त्वरित पाणीप्रश्न न सोडवल्यास 12 जुलै रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सुमारे 10 हजार लोकसंख्येच्या समशेरपूर गावाला 8 ठाकरवाड्या, नागवाडी व घोडसरवाडीचा भाग जोडलेला आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई 15 दिवसांपासून अधिकच तीव्र झाली आहे. माणसे व पशुधनाची तहान भागवण्यासाठी शासनाचा एक टँकर कुचकामी ठरत आहे. टँकरच्या दिवसातून 2 खेपा होतात. त्यातही एकाच खेपेत पाणी दिले जाते. गावात सुमारे पाच हजार पाळीव जनावरे आहेत. यात दुधाळ गायींचा मोठा समावेश असून पाणी व चारा टंचाईचा फटका दूध उत्पादनावर झाला आहे.

मंगळवारी (1 जुलै) सकाळी 9 वाजता समशेरपूर ग्रामपंचायतीने बोलावलेल्या ग्रामसभेस दीड हजार स्त्री-पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते. यावरूनच पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात येते.
ग्रामसभेत सरपंच चंद्रकांत फोडसे, उपसरपंच मंगला भरीतकर, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर जोरवर, कोंडाजी दोन्नर, कासम मनियार, भास्कर दराडे, विकास भरितकर, मधुकर दराडे, नितीन बेणके, पोपट दराडे, नारायण बेणके या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी चारा व पाणी टंचाईवर शासनाने गावाला सकारात्मक सहकार्य दिले नाही; तर 12 जुलै रोजी सकाळी 9 वाजता अकोले तहसील कार्यालयावर ग्रामस्थ व जनावरांचा मोर्चा काढून बेमुदत उपोषण करण्याचा ठराव एकमुखी संमत करण्यात आला.
मंगळवारी दुपारी या ठरावाची प्रत व 235 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन अकोल्याचे तहसीलदार चंद्रशेखर देशमुख यांना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दले. त्यातही ग्रामस्थांनी पाणी व चाराप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे.'

जनावरांसह आंदोलन
- समशेरपूर व वाड्यांचा पाणी, चारा व रोजगाराचा प्रश्न 11 जुलैपर्यंत प्रशासनाने सोडवला नाही, तर 12 जुलै पासून शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ आपल्या जनावरांचा मोर्चा घेऊन अकोले तहसील कचेरीवर जाऊन बेमुदत ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण करतील.’’ भास्कर दराडे, संचालक, बुवासाहेब नवले पतसंस्था, समशेरपूर.

प्रशासनाबाबत नाराजी
- दोन महिन्यांपासून समशेरपूर व वाड्या-वस्त्यांत पाणी टंचाई आहे. चारा संपला आहे, रोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. सरकारी अधिका-यांनी आढावा बैठक घेतली. मात्र, उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व लोकप्रतिनधीबाबत प्रचंड असंतोष आहे.’’ नितीन बेणके, शिवसेना तालुका उपप्रमुख.
फोटो - डमी पिक