नगर- केंद्रीयदुष्काळी पथकाने जिल्ह्यातील पाथर्डी, नगर पारनेर तालुक्यातील काही दुष्काळी गावांची बुधवारी पाहणी केली. केंद्र सरकारने तयार केलेल्या दुष्काळी गावांच्या यादीत जिल्ह्याचा समावेश नसताना खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे केंद्रीय दुष्काळी पथकाने दुष्काळी भागाचा दौरा केला.
पाथर्डी तालुक्यातील करंजी, मोहोज, कौडगाव कोल्हार, नगर तालुक्यातील भोरवाडी, सारोळा कासार अकोळनेर, तसेच पारनेर तालुक्यातील काही गावांची या पथकाने पाहणी केली. केंद्राच्या दुष्काळ निवारण पथकाचे अतिरिक्त आयुक्त विश्वेश्वर रथ उपसचिव विजय सोनी हे या पथकात होते. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अनिल कवडे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजी कर्डिले मोनिका राजळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले, शरद झोडगे अधिकारी उपस्थित होते. पथकाने ज्या भागाला भेट दिली त्या-त्या भागात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
पथकाचा दौरा सकाळी साडेनऊला पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून सुरु झाला. पथकामध्ये सुमारे २५ वाहनांचा ताफा होता. ज्या गावात हा ताफा जाई, तेथील लोक मदत मिळेल म्हणून पुढे येत. पथकाने थेट शेतात जाऊन जळालेल्या पिकांची पाहणी केली. पाथर्डी तालुक्याचा दौरा आटोपल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पथकाचे प्रमुख रथ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, काही गावांत फार नुकसान झाल्याचे चित्र दिसत होते. सलग दोन वर्षांपासून अशी स्थिती आहे. नुकसान किती झाले, ते आता सांगता येणार नाही. या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत. कमी पाऊस का पडत आहे, याबाबतही अभ्यास करावा लागेल.
जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, प्रामुख्याने पाणी चारा या प्रश्नांवर शेतकऱ्यांची मते पथकाने ऐकून घेतली. बाजरी, मका, कापूस, मूग फळबागांचे या भागात नुकसान झाले आहे.
चारा छावण्या तातडीने सुरू करा
जनावरांनाचारा नसल्यामुळे छावण्या सुरू करणे आवश्यक आहे. पाऊस नसल्यामुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने मदत द्यावी. ६० टक्के शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवलेला नाही. ज्यांनी उतरवला, त्यांना वर्षभरानंतर मदत मिळेल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे, असा सवाल आमदार कर्डिले यांनी उपस्थित केला.
उभी पिके जळाली
माणसेकशीही जगतील, पण जनावरांचे काय? पाऊस येईल म्हणून कर्ज काढून पीक घेतलं. चातकासारखी वाट पाहिली, पण पाऊसच आला नाही. शेतीसाठी घेतलेले कर्ज कसं फेडायचं? शेताकडे पाहिल की, डोळे भरून येतात. डोळ्यादेखत उभं पीक जळून गेले, पण काहीच करता आलं नाही.'' लक्ष्मीपुंड, महिला,अकोळनेर.
आता जगायच कसं?
विहिरीला पाणी नाही. टँकर येत नाही. आम्ही जगायचं कसं? गेल्या वर्षी थोडा पाऊस झाला. त्यामुळे घरात काही धान्य आहे. मात्र, पाऊसच झाला नसता, तर गाव सोडून जावं लागलं असतं. जरी उद्या पाऊस आला, तरी काय उपयोग? दुष्काळाची पाहणी करण्यासाठी कशाला पाहिजे २५ गाड्या ?'' टी.आर. भोर, शेतकरी,भोरवाडी.
पाठपुराव्यामुळे केंद्रीय पथक नगरमध्ये
मराठवाड्यातकेंद्रीय दुष्काळी पथकाने पाहणी केल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन नगर जिल्ह्यातीस दुष्काळी स्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले. नगर जिल्ह्यातही पथकाला पाठवून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून नगर जिल्ह्याबाबतही न्यायाची भमिका ठेवून केंद्रीय पथकाला जिल्ह्यात पाठवले.'' सदाशिवलोखंडे, खासदार,शिर्डी.
पंधरा दिवसांत अहवाल सादर करणार
नगरजिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केल्यानंतर या परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचा अहवाल येत्या पंधरा दिवसांत केंद्र सरकारकडे सादर करण्यात येईल. जुलै महिन्यात पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सरू केली आहे. या योजनेत कृषी, शेतीसंबंधी सर्व योजना आणण्यात येणार आहेत.'' विश्वेश्वररथ, अतिरिक्तआयुक्त, दुष्काळ निवारण पथक.
मोहोज (ता. पाथर्डी) येथे शेतातील पिकांचे झालेले नुकसान पाहून वाहनांकडे निघालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्रमुख व्ही. रथ यांच्यापुढे पिण्याच्या पाण्याची व्यथा मांडताना महिला. छाया: कल्पक हतवळणे
हंडे घेऊन मांडला पाण्याचा प्रश्न
दुष्काळीपथकाने कौडगाव येथे शेतीची पाहणी केल्यानंतर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या महिलांनी हंडे घेऊन पाण्याचा प्रश्न पथकासमोर मांडला. गावात पिण्याचे पाणी नाही. टँॅकर येत नाही. मैलभर पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याची कैफियत त्यांनी मांडली.
सरकारने मदत द्यावी
१९७२सालचा दुष्काळ पाहिला. तो दुष्काळ अन्नधान्याचा होता. आताचा पाण्याचा आहे. पिण्यासाठी पाणी नाही. पाण्यासाठी कोसो दूर जावे लागते. पाऊस नसल्यामुळे हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही. शेतीवर घेतलेले पीक जळून गेले. आता तरी सरकारने जागे होऊन आम्हाला मदत द्यावी.'' जयसिंगजाधव, शेतकरी,अकोळनेर.