आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळती रोखण्यासाठी प्रशासनाचे हातावर हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर व नागापूर औद्योगिक वसाहतीला (एमआयडीसी) पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिन्यांना गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. एकीकडे शहर व उद्योगांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे महापालिका व एमआयडीसीचे अधिकारी या पाणीगळतीकडे दुर्लक्ष करत आहेत. जागतिक जल दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’ने शनिवारी दोन्ही मुख्य जलवाहिन्यांची पाहणी केली असता 20 ते 25 ठिकाणी मोठय़ा प्रमाणात पाणीगळती सुरू असल्याचे विदारक सत्य समोर आले.
जागतिक जल दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पाणी बचतीचे महत्त्व सांगण्यात आले. मात्र, नगर शहरात पाणी बचतीकडे दुर्लक्ष होत आहे. साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या शहराला दररोज अवघे 58 ते 60 दशलक्ष लिटर, तर नागापूर व सुपा एमआडीसीतील उद्योगांसाठी दररोज 32 एमएलटी पाणी मिळते, परंतु हा पाणीपुरवठा करणार्‍या मनपा व एमआयडीसी या दोन मुख्य जलवाहिन्यांना मोठय़ा प्रमाणत गळती लागली आहे. ‘दिव्य मराठी’ने या दोन्ही जलवाहिन्यांची शनिवारी पाहणी केली. या वेळी अनेक ठिकाणी सुरू असलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी सुरू असल्याचे सत्य समोर आले. पाणी टंचाईकाळात पाण्याचा अपव्यय करणार्‍यांवर मनपा प्रशासन कारवाई करते, मात्र पाणीगळती रोखण्यासाठी दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाच्या दिरंगाईला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पाणीगळतीबाबत परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांना विचारले असता, ही गळती आजची नाही, तर गेल्या अनेक वर्षांपासूनची असल्याचे त्यांनी सांगितले. शिंगवे नाईक गावाजवळील काही शेतकरी तर पाणी गळतीला वैतागले आहेत. पाणीगळतीने जमीन नापिक झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत एमआयडीसी व मनपा अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रार अर्ज दिले, परंतु संबंधित अधिकारी पाणीगळतीकडे ढुंकूनही पाहत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली. मुळा धरण ते शहर या सुमारे 32 किलोमीटर अंतरावरील या दोन्ही मुख्य जलवाहिन्यांना गंज लागला आहे. या जलवाहिन्या चार दशकांपूर्वीच्या असल्याने त्यांची झीज झाली आहे. जलवाहिन्यांवरील गळतीमुळे काही ठिकाणी पाण्याचे तलाव निर्माण झाले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारी मनपाची जलवाहिनी, तर दर पंधरा-वीस दिवसातून एकदा फुटते. तिची दुरूस्ती पूर्ण होईपर्यंत लखो लिटर पाणी वाया जाते. एकाच ठिकाणी वारंवार जलवाहिनी फुटण्याचे प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. तरीही मनपा प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत. सध्या मध्यवर्ती शहराला आठवड्यातून पाच दिवस, सावेडी उपनगराला दिवसाआड, तर केडगावला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. नागापूर व सुपा एमआयडीसी, तसेच छावणी परिषदेला दररोज पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु जलवाहिन्यांवरील पाणीगळतीमुळे हा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे.
एमआयडीसी व मनपा प्रशासनाकडून जलवाहिन्यांवरील पाणीगळतीकडे दुर्लक्ष होत आहे. तक्रार अर्ज मिळूनही तीन-चार महिने अधिकारी प्रत्यक्ष गळतीच्या ठिकाणी जात नाहीत. उलट जलवाहिनी जुनी आहे, ती बदलण्यासाठी पुरेसा निधी व यंत्रणा नसल्याचे उत्तरे त्यांच्याकडून दिली जातात. त्यामुळे ही गळती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे.
‘फेज टू’चे काम संथगतीने
महापालिकेने हाती घेतलेल्या शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचे (फेज टू) काम मागील तीन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर मुळानगर येथून दररोज 89 दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येणार असून प्रतिमाणसी 135 लिटर पाणी मिळेल. त्यासाठी गरज आहे ती योजनेच्या कामाला गती देण्याची.
बुस्टर प्रकल्प अद्याप रखडलेलाच
बुस्टर स्टेशन नसल्याने एमआयडीसीच्या 35 वर्ष जुन्या जलवाहिनीवर पाण्याचा दबाव येतो. त्यामुळे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया जाण्याचे प्रकार वारंवार घडतात. यासाठी देहरे येथे बुस्टर प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय एमआडीसीने घेतला आहे. परंतु हा प्रकल्प अद्यापही सुरू झालेला नाही. त्यामुळे जलवाहिनीवरील पाणीगळती सुरूच आहे.