आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांची बेपर्वाई नगरमधील जलसाठय़ाच्या ‘मुळा’वर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अवघ्या महाराष्ट्रात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांचा कंठशोष चाललेला असताना अहमदनगर मनपा, एमआयडीसी आणि सिंचन आदी विभागांतील अधिकार्‍यांच्या बेपर्वाईमुळे दररोज पाच लाख लिटरपेक्षा जास्त पाण्याची नासाडी होत आहे. नगर जिल्ह्याला 35 योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवणार्‍या मुळा धरणाच्या परिसरात अधिकार्‍यांच्या डोळ्यादेखत दररोज दोन लाख लिटर पाणी वाया जात आहे, तर मुळा धरण ते नगर शहर या 35 किलोमीटरच्या पाइपलाइनलाही जागोजागी गळती लागली असून एकूण 40 ठिकाणांवरून होणार्‍या गळतीमुळे तीन लाख लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

नगर शहर, नगर एमआयडीसी आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात या जलवाहिन्यांवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे, संबंधित अधिकार्‍यांना माहिती विचारणार्‍या दै. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीला ‘वरिष्ठांचे पत्र घेऊन या’, अशी तंबी सिंचन विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने दिली. नगर जिल्ह्याचे दक्षिण आणि उत्तर हे दोन प्रमुख भाग पडतात. जामखेड, कर्जत, पारनेर या भागातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असताना उत्तरेत नेमकी उलट परिस्थिती आहे. या भागातील राहुरी, र्शीगोंदा, पारनेर, देवळाली प्रवरा आदी तालुक्यांतील नागरिकांना अद्याप जलसंकटाचे चटके बसलेले नाहीत. मात्र, धरण आणि इतर नैसर्गिक जलस्रोतांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे सध्या दुष्काळाच्या कराल छायेपासून कोसोदूर असणार्‍या या भागातील नागरिकांना एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये टंचाईची झळ बसणार आहे. जिल्ह्याची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी 70च्या दशकात बांधण्यात आलेल्या मुळा धरणातून विविध गावांच्या 35 पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. नगर शहरालाही याच धरणातून पाणी पुरवले जाते. मुळा धरणाच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे धरण परिसरातच पाण्याचा अपव्यय होत आहे. धरणाच्या मुख्य द्वारापासून सुरू होणारा हा बेफिकिरीचा अजब नमुना थक्क करणारा आहे. दहशतवाद्यांपासून धोका असल्यामुळे मुळा धरणाला पोलिस संरक्षण पुरवण्यात आले असून या ठिकाणी फोटो काढण्यासही मनाई करण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळील पोलिस चौकीमध्ये चार कर्मचारी आहेत. त्यांच्या वापरासाठी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे बागेसाठी सोडलेल्या पाण्याची पाइपलाइन फोडण्याचा उद्योग काही कर्मचार्‍यांनी केला आहे.
सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत येथे सतत पाणी वाहत असते. पाणी बचतीचा संदेश देणारी अनेक वचने धरणाच्या ‘स्पीलवे’वर (जलोत्सारी) लावली आहेत. मात्र, इथेही गळती होत असून 11 तास पाणी वाया जात आहे. परिसरातच अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी बांधलेल्या विर्शामगृहातही दिवसभर गळती होत आहे.

विर्शामगृहासमोरच बागेसाठी 10 इंची पाइपमधून पाणी पुरवले जात आहे. ठिकठिकाणी बसवलेल्या नळांमधूनही राजरोस गळती होत आहे. विर्शामगृहाच्या मागील बाजूस बांधलेल्या पाण्याच्या टाकीलाही तडे गेले असून त्यातूनही दिवसभर गळती होते. देहेर गावाजवळील 600 मीटर जलवाहिनी अतिशय जुनी झाल्यामुळे लवकरच पाइप बदलण्यात येणार आहेत, त्यासाठी 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. मनपाचे बुस्टर आणि नव्या जलवाहिनीमुळे गळती 50 टक्क्यांनी कमी होईल, असे सुभाष घिगे यांनी सांगितले. मुळा धरणातून नगर शहराला दररोज सुमारे 52 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, ठिकठिकाणी गळती होत असल्याने 70 टक्केच पाणी नगरकरांना मिळते. विशेष म्हणजे, मनपा प्रशासनाने 30 टक्के गळती गृहीत धरली आहे, असे पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांनी सांगितले.

कडक कारवाई करणार
धरण परिसरात पाणी गळती होत असेल तर संबंधित अधिकार्‍यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. धरण क्षेत्र आणि जलवाहिन्यांची पाहणी करून गळती थांबवण्याचे उपायही करण्यात येतील. मनपा आणि एमआयडीसी विभागातील अधिकार्‍यांनाही गळतीबाबत सूचित केले जाईल.- एम. पी. खाडे, कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, नगर

कामाच्या व्यापात प्रस्ताव रखडला
धरण परिसरातील विर्शामगृहाची पाण्याची टाकी खूप जुनी झाली आहे. मी एक वर्षापूर्वीच या ठिकाणी रुजू झाले असून या टाकीमधून पाणी वाया जाते, याची माहिती आहे. ती टाकी पाडून नव्या टाकीचा प्रस्ताव पाठवण्याचे काम मात्र इतर कामांच्या व्यापामुळे थांबले आहे. मात्र, मार्चअखेर नवीन टाकीचे काम सुरू होईल.
- आर. एम. कांबळे, शाखा अभियंता, मुळा प्रकल्प, सिंचन विभाग

बुस्टर भाडेतत्त्वावर घेणार
एमआयडीसीला पाणी पुरवणारी जलवाहिनी 35 वर्षे जुनी आहे. मुळानगर ते एमआयडीसी या पूर्ण लाइनवर एकही बुस्टर नाही. त्यामुळे जास्त दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने गळती होत आहे. मात्र, हा प्रकार थांबवण्यासाठी आमचे पथक प्रयत्नशील असून महापालिकेकडून बुस्टरही भाडेतत्त्वावर घेणार आहोत.
- सुभाष घिगे, उपविभागीय अभियंता, एमआयडीसी, नगर