आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जामखेड तालुक्याला पाणी देण्यास श्रीगोंद्याचा विरोध नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - जामखेड तालुक्याला पाणी देण्यास श्रीगोंद्याचा विरोध नाही, असे स्पष्ट करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पाणी आले नाही म्हणून बंधार्‍यात बोंबा मारणार्‍यांनी ज्या ठिकाणी पाणी अडले होते तेथे बोंबा मारल्या असत्या तर अधिक फायदा झाला असता, अशी टीका आमदार राम शिंदे यांच्यावर केली.


राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे तालुक्यातील जवळा येथे आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, समाजकल्याण सभापती प्रा. शाहू घुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय वारे, शरद मोरे, राजेंद्र गुंड, उपसभापती दीपक पवार, प्रदीप पाटील, प्रा. संजय वराट, जयदत्त धस, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब ढवळे, राजेंद्र गोरे, शहाजी पाटील, हुसेन सय्यद, शब्बीर शेख आदी उपस्थित होते. शेलार म्हणाले, कुकडीचे पाणी जवळा येथील बंधार्‍यात सोडण्यासाठी आपण जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांच्याकडे वकिली करू. जिल्हा परिषदेच्या समित्या काही अडचणींमुळे कर्जत-जामखेडला देता आल्या नाहीत, परंतु विकासकामांत झुकते माप देण्याचे काम सातत्याने करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काहींना लाटेवर स्वार व्हायचे आहे. परंतु तसे होणार नाही. पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार होणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.


लंघे म्हणाले, जिल्हा परिषदेचा सदस्य काम करू शकतो हे वारे यांनी सिद्ध केले आहे. श्रेष्ठी कोणाला उमेदवारी द्यायचे ते ठरवतील, परंतु आपण राष्ट्रवादीचे काम करायचे आहे.


वारे म्हणाले, आमदार शिंदे जवळ्याला कर्मभूमी म्हणतात, पण त्यांनी केवळ सात लाखांचा निधी दिला. मी मात्र एक कोटीचा निधी दिला. साडेचार वर्षांच्या काळात आमदारांनी किती निधी दिला याचे उत्तर त्यांनी द्यावे.
जामखेडला नगर परिषदेची एकमेव अधिसूचना काढण्यात आली आहे. महिनाभरात जामखेड ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला जाईल, असे राजेंद्र कोठारी यांनी सांगितले. प्रास्ताविक हुसेन सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रशांत पाटील यांनी मानले.


ग्रामपंचायत सदस्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
या कार्यक्रमात जवळ्याचे सरपंच अनिल पवार, ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब वाळुंजकर, अय्युब शेख, प्रवीण लेकुरवाळे, अरुण रोडे, शशिकांत राऊत यांच्यासह रिपाइंचे शेखर कांबळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कांबळे यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.


प्रचाराला सुरुवात
या मेळाव्यात बहुतांश वक्त्यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कृषी धोरणाची स्तुती केली. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये घड्याळाला मत देण्याचे आवाहन केले. हे सांगताना त्यांनी श्रेष्ठींनी उमेदवार कोणीही दिला तरी आपल्याला राष्ट्रवादीचेच काम करायचे असल्याचे सांगितले.