आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेवगाव तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- शेवगाव तालुक्यात पावसाने दडी मारल्याने भीषण पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी जून-जुलैअखेर तालुक्यात 245 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र 5 ऑगस्टअखेर तालुक्यात केवळ 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील अनेक भागात पाण्याबरोबरच चाराटंचाईही निर्माण झाली आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर चापडगाव, बोधेगाव, बालमटाकळी, खरडगाव, सामनगाव, आव्हाणे खुर्द, ढोरजळगाव या भागात प्रशासनाच्या वतीने चारा डेपो सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या वतीने 4 हजार 301 शेतकर्‍यांना 31 लाख 32 हजार रुपये किमतीच्या 1 हजार 139 टन चार्‍याचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसीलदार गणेश मरकड यांनी दिली. सध्या तालुक्यातून प्रतिदिनी 250 टन चार्‍याची मागणी असून 55 ते 60 टन चारा उपलब्ध होत आहे. शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे हातगाव, गदेवाडी, शहरटाकळी, भातकुडगाव व शेवगाव या पाच ठिकाणी चारा डेपो सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्याकडे पाठवण्यात आला आहे, असे मरकड यांनी सांगितले.
दरम्यान, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली असली, तरी गावपातळीवर सरकारी यंत्रणेतील समन्वयाअभावी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाठी कार्यालयातून लाभार्थींना चारा वाटपाची कार्ड मिळाली नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. चारा वाटपासाठी वजनकाटे कमी असल्याने दिवसभरात संपूर्ण लाभार्थींना चारा वाटप करणे शक्य होत नसल्याने अनेकांना चार्‍यापासून वंचित रहावे लागते, तर काहींना चार्‍यापेक्षा वाहतुकीचा खर्चच जादा लागत आहे. त्यामुळे दोन तीन गावांना मिळून एक चारा डेपो सुरू करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.