आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीगोंद्यात पुन्हा दिवसाआड पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा: घोड धरणाचे पुढील आवर्तन अनिश्चित असल्याने शहराला पुन्हा दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. दरम्यान, विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी खालावली असल्याने शहरवासीयांपुढे पाणी टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे.
सध्या शहराची लोकसंख्या सुमारे 50 हजारांच्या आसपास आहे. 37 वर्षांपूर्वी पाच हजार लोकसंख्येसाठी वेळू तलावातून नळयोजना राबवण्यात आली. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढली. मात्र, उपलब्धता तेवढीच राहिली. सध्या वेळू तलावात फक्त 35 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. या तलावात घोड धरणातील पाणी सोडले जाते. मात्र, धरणातून पुढील आवर्तन केव्हा सुटेल? याची कोणतीच हमी पाटबंधारे विभाग देत नसल्याने पालिकेने 50 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक महिन्याचे पाणी दोन महिने वापरण्यात येईल. यामुळे शहराला एक जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
पालिकेने पाण्यात निम्म्याने कपात केल्याने ऐन उन्हाळ्याच्या मध्यात नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दुष्काळाच्या तडाख्यामुळे आधीच विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. शहरात जागोजागी पालिकेने हातपंप बसवले आहेत. मात्र, पाण्याअभावी त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त पंप बंद पडले आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी 300 फुटांपेक्षा जास्त खोल गेली असल्याने हातपंप एवढय़ा खोलीचे पाणी उपसू शकत नाही. नागरिकांपुढे अस्मानी संकटाबरोबरच सुल्तानी संकट उभे ठाकले आहे. उन्हाची काहिली, पाण्याची टंचाई, निकामी कूपनलिका व पर्यायी व्यवस्थेचा अभाव यामुळे शहरातील जनता चांगलीच त्रस्त झाली आहे.