आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छावणी परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचा रोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भिंगार शहरातील पाणीप्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर झाला आहे. शुक्लेश्वर कॉलनी, माळी गल्लीसह विविध भागात गेल्या दहा दिवसांपासून निर्जळी आहे. छावणी परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. निवडणुकीची धामधूम संपली, त्यामुळे आतातरी वेळेत व पुरेसे पाणी मिळेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. परंतु तसे न झाल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

भिंगार छावणी मंडळाची निवडणूक होऊन आठ दिवस उलटले. निवडणूक काळात उमेदवारांनी नागरिकांना मोठी आश्वासने दिली. त्यात पुरेसे व मुबलक पाणी देण्याबाबत अनेकांनी सांगितले. परंतु निवडणूक होताच नवनिर्वाचित सदस्यांना पाणीप्रश्नाचा विसर पडला आहे. संपूर्ण भिंगारमधील पाण्याची वितरण व्यवस्था िखळखिळी झाली आहे. जागोजागी पिण्याच्या पाइपलाइन फुटल्या आहेत. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाइपलाइन गटारींमधून गेलेल्या आहेत. त्यांना गळती लागल्याने गटारीचे पाणी थेट पिण्याच्या पाइपलाइनमध्ये उतरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्लेश्वर कॉलनी, माळी गल्लीसह इतर भागाला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन खराब झाल्याने ती बदलण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काम सुरू करण्यापूर्वी या भागाला पाणीपुरवठा करणारी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक होते. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत जुनी पाइपलाइन खोदून नवीन काम सुरू केले. त्यामुळे अनेक भागाला गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. ठेकेदाराने मनमानी पध्दतीने काम सुरू केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपली समस्या सांगितली. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही, याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले, परंतु अजूनही पिण्याचे पाणी मिळाले नसल्याचे या भागातील नागरिकांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

भिंगारचा पाणी सोडवा
-आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी भिंगारच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केले, आता नवीन सत्ताधारी आलेत, त्यांनी तरी हा पाणीप्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा आहे. ठेकेदाराने मनमानी पध्दतीने काम सुरू केल्याने शुक्लेश्वर कॉलनी, माळी गल्ली व इतर भागाला गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाणी मिळालेले नाही. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.''
रामचंद्र बिडवे, नागरिक.

जास्त पाणीपट्टी वसूल करूनही पुरेसे पाणी मिळत नाही
नागापूर औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून छावणी परिषदेला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी नगर शहरापेक्षा जास्त पाणीपट्टी वसूल करण्यात येते, तरी देखील येथील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. एकीकडे भिंगारची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था खिळखिळी होत आहे. त्यामुळे नवीन सदस्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी येथील नागरिकांची अपेक्षा आहे.