आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पिंपळगाव माळवी’चे पुनरुज्जीवन करावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरशहराला एकेकाळी पाणीपुरवठा होणाऱ्या पिंपळगाव माळवी तलावाचे जलयुक्त शिवार योजनेत पुनरुज्जीवन करावे. त्यामुळे शहराच्या काही भागाला पाणी पुरवठा करणे शक्य होईल, असे निवेदन नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिले आहे. ‘दिव्य मराठी’नेही या आधी याविषयाकडे सातत्याने लक्ष वेधले आहे.
पिंपळगाव माळवी तलावातून १८८५ पासून शहराला पाणी पुरवठा केला जात होता. हा पाणी पुरवठा गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वानुसार होत होत होता. त्यासाठी विजेची गरज पडत नव्हती. सध्याचा पाणीपुरवठा होण्यासाठी विजेची गरज पडते. नगर शहरासाठी मुळा धरणातून पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पिंपळगाव माळवीतून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पाण्याचा उपसा बंद झाल्यानंतर या तलावाकडे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे हा तलाव गाळाने भरून त्याची साठवण क्षमता कमी होत गेली. तलाव परिसरतील सातशे एकर जमीन महापालिकेची आहे. इतकी मोठी जमीन असलेली राज्यातील ही एकमेव महापालिका आहे. मध्यंतरी या जमिनीवर परिसरातील धनाढ्यांनी अतिक्रमणेही केली. पण न्यायालयाने याबाबत महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्याने ही सर्व जमीन महापालिकेच्या मालकीची झाली आहे.

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या तलावातील गाळ काढल्यास तलावाची पाणी साठवण क्षमता वाढून शहराला जादा पाणी पुरवठा करणे शक्य होईल किंवा तेथून टँकरने पाणी देता येईल. कृपया आपण नागरिक कृती मंचाच्या या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा. या प्रकल्पासाठी श्रमदान, लोकसहभाग मिळवून देण्यासाठी मंचाचे सर्व सदस्य सक्रिय राहतील, तसेच नगर शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. विकासाला गती मिळेल, असा आम्हा विश्वास असल्याचे चंगेडे यांनी म्हटले आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थितीमध्ये तलावाच्या क्षेत्रावर जनावरांच्या छावण्या उभारणेही शक्य असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पर्यटनस्थळ शक्य
तलावाचेसंपादित क्षेत्र ७०० एकर असून धरण वगळता उर्वरित अंदाजे २५० एकर क्षेत्राचा पर्यटन विकास केंद्र म्हणून वापर करता येईल. धरणाच्या बाहेर भरावाच्या बाजूला एक मैल लांबीच्या परिसरामध्ये कॅचमेंट भागात १०.२५ चौरस मैल परिसर वृक्षारोपणासाठी उपलब्ध होईल. साधारणपणे ३०० गुणिले ४३५. ६० म्हणजेच कोटी ३० लाख ६८ हजार चौरस फुटांवर वृक्षारोपण करता येईल. ४० हजार झाडे तेथे लावता येतील.

कोटी १४ लाख खर्च
साधारणपणेएक जेसीबी यंत्र एक तासामध्ये तीस घनमीटर गाळ काढू शकतो, असे गृहित धरल्यास ३० हजार ६६६ तासांत तलावातील गाळ काढला जाऊ शकतो. एक जेसीबीसाठी सातशे रुपये प्रति तास भाडे गृहित धरल्यास कोटी १४ लाख ६६ हजार ६६६ रुपये खर्च येईल. या खर्चात या तलावामुळे भविष्यात नगर शहराला महापालिकेला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे.

हजारो एकर जमीन सुपिक होईल
यातलावाचे क्षेत्र सातशे एकरांचे असून, त्यातील गाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीत टाकल्यास हजारो एकर जमिनीची सुपिकता वाढणार आहे. या तलावाची पाण्याची क्षमता १८२.५ दशलक्ष घनफूट आहे. उपयुक्त पाणी क्षमता १६४ दशलक्ष घनफूट आहे. धरणात ४० टक्के गाळ गृहित धरल्यास १.८४ दशलक्ष घनफूट म्हणजेच १८ लाख ४० हजार घनमीटर गाळ आहे. हा गाळ काढून शेतीत पसरल्यास शेती सुपीक होणार आहे.

लोकसहभागातून तलावाचे पुनरुज्जीवन शक्य
सार्वजनिकबांधकाम, सहकारी संस्था यांच्याकडे असलेली वाहने, जेसीबी मशीन या साधनांचा वापर केल्यास कमी खर्चामध्ये तलावाचे पुनरुज्जीवन शक्य आहे. कंपन्यांना सामाजिक उपक्रमांवर नफ्यातील काही रक्कम खर्च करावी लागते. पतसंस्था, बँक अशा आिर्थक क्षेत्रातील संस्थांनी तलावाच्या पुनज्जीवनासाठी वापरता येऊ शकते. महाविद्यालयेही श्रमशिबिराचे आयोजन करतात. या विद्यार्थ्यांचे श्रमशिबिर पिंपळगाव माळवी येथे घेतल्यास त्यातूनही मोठे काम उभारले जाऊ शकते.

पथदर्शक प्रकल्प
शुद्धपाण्याचे नवीन जलस्त्रोत उपलब्ध नाहीत. सीनानदीचा उगम बायजाबाई जेऊर गावातील महादेवाची खोडी या डोंगरात हाेत आहे. नदीच्या उगमापासून धरणापर्यंत पाण्यामध्ये कोणतेही प्रदूषण करणारे औद्योगिक क्षेत्र िकंवा कारखाना नाही. त्यामुळे पाणी शुद्ध आरोग्यास हितकारक आहे. पिण्यासाठी त्याचा वापर करण्यास कमी खर्च होणार आहे. जलयुक्त शिवार याेजनेंतर्गत या तलावाचे पुर्नजीवन केल्यास राज्यासाठी एक पथदर्शक प्रकल्प ठरेल. या परिसरातील २५ ते ३० गावांमधील भूगर्भातील पाणी पातळी वाढेल. त्यातून ही गावे टँकरमुक्त होतील. या ठिकाणी अस्तित्वात असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प एक आदर्श प्रकल्प आहे.
दीडशे वर्षे मिळेल लाभ
नगरशहरापासून १६ किलोमीटरवरील पिंपळगाव माळवी तलावाची निर्मिती झाल्यापासून शंभर वर्षे झाली आहेत. या कालावधीत सुमरे १४ फूट गाळाचा थर साचला आहे. हा सर्व थर काढून या तलावाचे पुनरुज्जीवन केल्यास आगामी दीडशे वर्षात पनरुज्जीवन करण्याची गरज भासणार नाही. त्यातून शहराला शाश्वत स्वरूपाचा पाणीपुरवठा होऊन जलयुक्त अभियानाचे मोठे काम होईल, असे चंगेडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सर्वांनीच जोर लावण्याची गरज
पिंपळगाव माळवी तलावाचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांनी अतिशय दूरदर्शीपणे त्याची छोट्या धरणासाठी निवड केली होती. आताही या तलावाकडे लक्ष दिले, तर शहराच्या काही भागांत विजेशिवाय पाणी मिळू शकेल, तसेच हा परिसर चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकतो.'' शशिकांत चंगेडे, अध्यक्ष,नागरिक कृती मंच.