आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीचा रब्बी आवर्तनाला फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जायकवाडीला सोडण्यात आलेल्या पाण्याने आता रब्बीच्या आवर्तनातही खोडा घातला आहे. कालवा सल्लागार समितीच्या नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत सिंचनासाठी उपलब्ध असणाऱ्या साडेतीन टीएमसी (३५०० दशलक्ष घनफूट) पाण्यातून रब्बीसाठी एक आवर्तन देण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून जायकवाडीसाठी सुरू असलेला विसर्ग आणखी १५ दिवस चालणार आहे. त्यामुळे रब्बीचे आवर्तनही १५ दिवस लांबणीवर पडल्याने गरजेच्या वेळी लाभक्षेत्राला सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे.

गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या आदेशानुसार मुळा धरणातून जायकवाडीसाठी नोव्हेंबरला पाणी सोडण्यास सुरुवात झाली. धरणातून एकूण १.७४ टीएमसी (१७४० दशलक्ष घनफूट) पाणी जायकवाडीला जात आहे. त्यातील १.२७ टीएमसी (१२७० दशलक्ष घनफूट) पाणी शनिवार सकाळपर्यंत सोडण्यात आले होते. आणखी ४७० दशलक्ष घनफूट पाणी सोडणे बाकी आहे. पाणीपातळी धरणांच्या दरवाजाखाली गेल्याने गेल्या आठवड्यापासून उजव्या डाव्या कालव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

सध्या उजव्या कालव्यातून १७० क्युसेस तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेस वेगाने पाणी सुरू आहे. पाण्याचा वेग नदीपात्रात पोहचणारे पाणी लक्षात घेता सध्या सुरू असलेल्या पाण्याचा जायकवाडीला काडीमात्र लाभ मिळणे अशक्य अाहे. कारण कालव्याद्वारे नदीपात्रात सुरू असलेले पाणी जायकवाडीपर्यंत पोहचणारच नाही.

खरीप धोक्यात असताना आवर्तनासाठी लाभक्षेत्रातून आंदोलने करण्यात आली. सातत्याने मागणी करूनही पाणी सोडल्याने लाभक्षेत्रात खरीप हंगाम वाया गेला. पूर्ण क्षमतेने एखादे आवर्तन मिळाल्यास किमान रब्बी हंगाम हाती लागण्याची अपेक्षा होती. मात्र, प्रखर विरोध न्यायालयीन लढ्यानंतरही जायकवाडीला पाणी सोडणे भाग पडले. त्यामुळे रब्बीसाठी एकच तेही अपुरे आवर्तन मिळणार आहे.

लाभक्षेत्रातून तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन शिल्लक राहणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, तातडीने आवर्तन सोडण्यात जायकवाडीसाठी सुरू असलेल्या पाण्याचा अडथळा आला.

जायकवाडीला सुरू असलेले पाणी पूर्णपणे थांबल्यानंतरच आवर्तन सोडता येणार आहे. आदेशानुसार आणखी ४७० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच सिंचनासाठीचे पाणी सोडणे शक्य होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांकडून देण्यात आली.

अपुरे पाणी
पाणी सोडण्यापूर्वी मुळा धरणात १५२७१ दशलक्ष घनफूट पाणी होते. आदेशानुसार पाणी सोडल्यानंतर धरणात १३५०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहील. यातील मृतसाठा, पिण्याच्या पाण्यासह इतर आरक्षण, बाष्पीभवन इतर व्यय यासाठी १०००० दशलक्ष घनफूट पाणी लागेल. उर्वरित ३५०० पैकी उजव्या कालव्यातून ३००० डाव्या कालव्यातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी देण्यात येणार आहे. दोन्ही कालव्यातून पुर्ण क्षमतेने आवर्तन देण्यासाठी जवळपास ५००० दशलक्ष घनफूट पाण्याची गरज भासते.

पाणी वाया गेले
महामंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना मुळा धरणाच्या कालव्यातून ५५९ दशलक्ष घनफूट पाणी नदीपात्रात जात आहे. हे पाणी जायकवाडीला पाेहचणार नसले तरी नदी कालव्याकाठच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा थोडाफार लाभ मिळण्यासोबतच परिसरातील पाण्याचे स्त्रोत जिवंत होण्यास मदत मिळणार आहे. हे वाया जाणारे पाणी आवर्तनासाठी उपलब्ध झाले असते, तर सिंचनाचे क्षेत्र आवर्तनाचा कालावधी वाढणे शक्य होते. दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार धरणसाठा कमी असताना कालव्यातून सोडलेले पाणी जायकवाडीत गेले नव्हते.