नगर - फेब्रुवारीतच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३२ गावे व १६१ वाड्या-वस्त्यांवर पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने तेथील ८४ हजार ८९१ नागरिकांना टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे.
सध्या पारनेरमध्ये सर्वाधिक १६ गावे व ८५ वाड्या-वस्त्यांना २२ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मार्च महिन्यापासून टँकरची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे असून, तसे प्रस्ताव प्रशासनाकडे येत आहेत. खरिपाची कमी आणेवारी असलेल्या ५१६ गावांना दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. आगामी टंचाईची स्थिती लक्षात घेऊन १४ तालुक्यांतील १ हजार ७१० गावांसाठी त्या-त्या भागातील धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरक्षित पाणीसाठ्यात ९.१७ टक्के वाढ करण्यात आली आहे.
उत्तरेत दोन टँकर
शासकीय २१ व खासगी २८ टँकर सुरू आहेत. संगमनेर २, नगर ७, पारनेर २२, पाथर्डी ७, शेवगाव १, कर्जत ३, जामखेड ४ व श्रीगोंदे ३ टँकर आहेत. उत्तरेत केवळ संगमनेर तालुक्यात टँकर सुरू असून, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहात्यात अद्यापि एकही टँकर सुरू नाही.
जिल्ह्यात १० हजार हेक्टरवर चारापिकांचे नियोजन
टंचाईची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने यंदा जनावरांच्या चा-याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात १६ लाख १८ हजार ८०३ जनावरे आहेत. चाराटंचाई भासू नये, यासाठी गतिमान वैरण विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे. यंदा १० हजार हेक्टर क्षेत्रावर चारापिके घेण्यात येणार असून, सुमारे १ लाख ८० हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध होणार आहे.