नगर/ औरंगाबाद - जायकवाडी धरणासाठी जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी शुक्रवारी सकाळी थांबले. गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या आदेशानुसार भंडारदरा व निळवंडे धरणातून ४२०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विसर्ग बंद करण्यात आला. जायकवाडीसाठी १३ दिवस विसर्ग सुरू ठेवण्यात आला होता.
जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानंतर गोदावरी खोरे विकास महामंडळाकडून जायकवाडीला नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. ५ डिसेंबर रोजीच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करत भंडारदरा धरणातून ७ डिसेंबर रोजी विसर्ग सुरू करण्यात आला, दुस-या दिवशी पाणी मुळातून जायकवाडीकडे झेपावले. मुळातून ३६००, तर भंडारदरा व निळवंडे धरणातून ४३०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्याचा आदेश होता. पाणी सोडण्याच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच महामंडळाने आदेश दिले. महामंडळाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करत जिल्ह्यातील संगमनेर व लोणीतील कारखाने व इतर संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय उच्च न्यायालयातच होईल, असे स्पष्ट केले. त्याप्रमाणे उच्च न्यायालयातून तीन दिवसांपूर्वी निर्णय आला. या निर्णयानुसार नियामक आयोगाला पाणी सोडण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट करून लाभक्षेत्रातील शेतक-यांशी चर्चा करूनच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्याचे आदेश आयोगाला देण्यात आले आहेत. मुळातून पाणी सोडण्याची प्रक्रिया निकालापूर्वीच १५ डिसंेबर रोजी पूर्ण करण्यात आली, तर भंडारद-याची प्रक्रिया शुक्रवारी संपली. याचा लाभ नाशिक जिल्ह्याला झाला. नाशिक व नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्याचे आदेश अपेक्षित होते. मात्र, केवळ नगरमधूनच पाणी सोडण्यात आले.
हिशेबात गोंधळ
"मुळा'च्या विसर्गाचे पाणी सर्वप्रथम जायकवाडीत पोहोचले. त्यानंतर भंडारदरा व निळवंडेचे पाणी आले. त्यामुळे जायकवाडीत मुळा व भंडारदरातून स्वतंत्रपणे किती पाणी आले याचा हिशेब लावण्यात गोंधळ उडत आहे. पूर्ण पाणी जायकवाडीत पोहोचल्यानंतर दोन्ही धरणांतून निश्चित किती पाणी गेले, हे स्पष्ट होणार आहे.
तीन टीएमसीचा अंदाज
मुळा धरणातून जायकवाडीत किती पाणी पोहोचले, याचा अद्याप अहवाल मिळाला नाही. मात्र, पाणी वाहून जाण्यास नदीपात्रातील परिस्थिती अनुकूल असल्याने जवळपास तीन टीएमसी (३००० दशलक्ष घनफूट) पाणी पाेहोचले असण्याची शक्यता आहे.”
ए. एस. वडार, कार्यकारी अभियंता.
अंबडला ४ एमएलडी पाणी द्या
अंबड | जायकवाडी-जालना जलयोजनेतून अंबड शहराला चार एमएलडी पाणी द्यावे, असे आदेश राज्य शासनाने दिले. यासंदर्भात नगर विकास विभागाने औरंगाबाद विभागीय आयुक्तांना पत्र दिले असून त्यामुळे अंबडचा पाणीप्रश्न निकाली निघाला. या पत्रात अंबडला चार एमएलडी पाणी देण्याबाबत स्पष्ट आदेश आहेत, परंतु त्यासाठी अंबड पालिकेने वीज बिलाची देयके, देखभाल दुरुस्ती व इतर आनुषंगिक खर्चासाठी आवश्यक रक्कम जालना पालिकेकडे दरमहा आगाऊ भरणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
जायकवाडीचा साठा ३२ %
जायकवाडीचा साठा ३२ टक्के झाला असून यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, धरण्यातील पाणी कधी, कोठे सोडायचे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, परळीला काही प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली.