नगर- जलसंपत्ती अधिनियम प्राधिकरणाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणातून पाणी सोडावेच लागणार आहे. जायकवाडीला पाणी सोडू नये, यासाठी उत्तरेतील नेते व माजी मंत्री पहिल्यांदाच एका सुरात बोलत आहेत. असे असले, तरी प्रशासनाला आदेशाची अंमलबजावणी करणे अपरिहार्य ठरणार आहे. प्राधिकरणाच्या आदेशानुसार सरकारी आदेशाची प्रतीक्षा पाटबंधारे विभागाला असून आदेश आल्यानंतर जायकवाडीला पाणी सोडावेच लागणार आहे.
समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार प्राधिकरणाने गोदावरी खोऱ्यातील वरील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे आदेश सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात दिले आहेत. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता व मध्येच लागू झालेली राष्ट्रपती राजवट यामुळे नगर व नािशक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा विषय मागे पडला. पाणी सोडण्याचे आदेश देणाऱ्या प्राधिकरणाला अर्धन्यायिक अधिकार आहेत. त्यामुळे प्राधिकरणाचे आदेश प्रशासनाला डावलता येणार नाहीत. हे आदेश नव्याने सत्तारुढ झालेल्या सरकारकडे जातील. प्राधिकरणाच्या आदेशानुसार पाणी सोडण्याबाबतचे आदेश सरकारकडून काढण्यात येतील. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ पातळीवरून हे आदेश जिल्हास्तरावर येतील. त्यानंतर जायकवाडीला कोणत्या धरणातून किती पाणी सोडण्यात येणार आहे, याचा खुलासा होणार आहे. नगर जिल्ह्यातील तीन धरणांसह नाशिक जिल्ह्यातूनही जायकवाडीला पाणी द्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील मातब्बर नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, मधुकर पिचड यांनी परस्परांच्या सुरात सूर मिसळत जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध दर्शवला. यापूर्वीही त्यांच्याकडून विरोध झाला होता. मात्र, सध्याचा एकसुरीपणा त्यात नव्हता. औरंगाबादच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळताना थोरात व विखेंना पाणी सोडण्यास विरोध करणे शक्य नव्हते. माजी मंत्री व लाभक्षेत्रातून जायकवाडीला पाणी सोडण्यास कितीही विरोध झाला तरी, प्रशासनाला पाणी सोडावे लागणार आहे. उत्तरेतून पाणी सोडण्यास विरोध होत असताना "मुळा'च्या लाभक्षेत्रातून विरोध करण्यास कोणीही अद्याप पुढे आलेले नाही.
पाणी धोरणच आहे चुकीचे
नदीखोरे गृहीत न धरता धरणांवर आधारित पाणीवाटपाचे समन्यायी धोरण अवलंबणे, पाणी जाण्याचे थांबवायचे असेल, तर प्राधिकरणाच्या आदेशाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणे किंवा नदी खोऱ्यातील सर्वांनी एकत्रित बसून समन्वयाने मार्ग काढणे, हे तीन पर्याय उपलब्ध आहेत. यातील मध्यम मार्ग काढण्याच्या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जयप्रकाश संचेती, निवृत्त पाटबंधारे अधिकारी.
मुळा धरणाची सद्यस्थिती
मुळा धरणात सध्या 23 टीएमसी (22 हजार 995 दशलक्ष घनफूट) पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या दोन्ही कालव्यांमधून पिकांसाठीचे आवर्तन सुरू आहे. उजव्या कालव्यातून 1611 क्युसेक्सने, तर डाव्या कालव्यातून 320 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. उजव्या कालव्यातून आतापर्यंत 1290 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले असून आवर्तन आणखी 25 दिवस चालणार आहे. सध्याच्या आवर्तनातून साडेपाच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे.