आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षानिमित्त पाणी बचतीचा संकल्पाचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा विश्रामबागच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पाणी बचतीचा संदेश दिला.
नगर - नगर शहरात भरपूर पाणी, तर ग्रामीण भागात एक हंडा पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणारी जनता असे चित्र आहे. नगर शहराला वर्षाला जेवढे पाणी लागते तेवढ्या पाण्यात इस्त्राइल देशातील एका जिल्ह्याची बारमाही शेती होऊ शकते.त्यामुळे पाणी बचत केल्यास हे चित्र बदलण्यास नक्कीच मदत होईल या हेतूने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा विश्रामबागच्या विद्यार्थांनी शाळा परिसरात घरोघरी जात 'जल है तो कल है' म्हणत नववर्षानिमित्त पाणी बचतीचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची छाया आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जनता भटकत आहे. पुढील युद्ध पाण्यासाठी होतील याची चाहूल लागली आहे. नगर शहरात त्या मानाने भरपूर पाणी मिळत आहे. या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्ययही होत आहे. पाण्याची परिस्थिती पाहता पाणाी बचतीची खरी गरज आहे. पाणी बचतीचे सोपे सोपे उपाय सांगत विद्यार्थ्यांनी घरोघरी जात पाणी बचतीसाठी माळीवाडा परिसरातील लोकांना साकडे घातले. नव वर्षानिमित्त पाणी बचतीचा संकल्प करण्याचे आवाहनही विद्यार्थ्यांनी जनतेला केले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला यावेळी मुख्याध्यापिका संध्या मकाशीर, शिक्षक संगीता भंडारी, गणेश बुरा, जितेंद्र निकम आदी उपस्थित होते.
आम्हाला साथ द्या
मी शिंदेवाडी-अरणगाववरून शाळेसाठी नगरला येतो. आमच्याकडे पाण्याची मोठी कमतरता आहे. आम्ही पाणी बचतीसाठी अनेक उपाय करतो. शहरातील लोकांना भरपूर पाणी मिळते. त्यांनीही पाणी बचत केल्यास खूप पाणी वाचेल त्याचा फायदा ग्रामीण भागातील जनतेलाही होईल. पाणी संकट सर्वांना दिसत आहे. पण उपाय मात्र कोणी करत नाही. आता सर्वांनीच स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे. आम्ही सुरुवात केली आहे. सर्वांनी त्यास साथ द्यावी. निखिल शिंदे, विद्यार्थी.
बातम्या आणखी आहेत...