आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या मान्सूनकडे लागले जिल्ह्यातील बळीराजाचे डोळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात आतापर्यंत 70 टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त 40 टक्के पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा 30 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. तथापि, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने खरिपाची पिके जळण्याचा धोका निर्माण झाला असून महिन्याभरात 58 टँकर वाढले आहेत. सध्या जिल्ह्यात 106 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाऊस नसल्याने पोळ्याच्या सणावरही परिणाम झाला आहे.

मागील दोन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. यंदा मात्र जूनच्या प्रारंभीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. जून व जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे खरिपाच्या पेरण्या समाधानकारक झाल्या. मात्र, नंतर 8 ऑगस्टपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षी 2 सप्टेंबरअखेर 40 टक्के पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत 70 टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत 4 हजार 636 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अकोले तालुक्यात सर्वाधिक 555 मिलिमीटर पाऊस झाला. संगमनेर 265, कोपरगाव 294, श्रीरामपूर 299, राहुरी 252, नेवासे 259, राहाता 361, नगर 302, शेवगाव 363, पाथर्डी 294, पारनेर 286, कर्जत 282, श्रीगोंदे 311 व जामखेडमध्ये 411 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

खरिपाची 130 टक्के पेरणी झाली असली, तरी पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाण्याचे संकट निर्माण झाले आहे. टँकरच्या मागणीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात 1 जून अखेरपर्यंत 705 टँकरने 500 गावे, 2 हजार 288 वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा सुरू होता. त्यानंतर 29 जुलै अखेरपर्यंत 436 टँकरने 328 गावे व 1 हजार 538 वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, जून-जुलै महिन्यांत झालेल्या दमदार पावसामुळे टँकरची संख्या मोठय़ा प्रमाणात घटली होती. 5 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ 48 टँकर सुरू होते. आता मात्र टँकरची संख्या 106 वर गेली आहे.

अडीच लाख नागरिकांना टँकरचे पाणी
जून-जुलै महिन्यांत दमदार पाऊस झाला. मात्र, ऑगस्टपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातून टँकरची मागणी वाढली आहे. 5 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात केवळ 48 टँकर सुरू होते. 48 टँकर तब्बल 1 लाख 4 हजार 732 नागरिकांची तहान भागवत होते. मात्र, 8 ऑगस्टपासून पावसाने विश्रांती घेतल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. महिन्याभरात तब्बल 58 टँकर वाढले आहेत. 4 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील 124 गावे 404 वाड्या-वस्त्यांना 106 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.