आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजून पावणेतीन लाख जनता टँकरवर अवलंबून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी काही भागात अजूनही तीव्र पाणीटंचाई आहे. नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे असल्याने 2 लाख 73 हजार 950 लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा नुकतीच अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. टंचाई स्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. उपाध्यक्ष मोनिका राजळे, सदस्य अँड. सुभाष पाटील, सुनील गडाख, शारदा भोरे, केशव भवर, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. सी. निकम आदी सभेस उपस्थित होते.

टंचाई दूर करण्यासाठी नळ योजना सुरळीत चालणे आवश्यक आहे. योजनांसाठीचे वीजबिल व्यावसायिक दराने आकारले जाते. परंतु जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या फारशा सक्षम नसल्याने महावितरणचे बिल भरण्यात अडचणी निर्माण होतात. थकबाकीमुळे योजना बंद पडल्यास संबंधित गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे वीजबिल घरगुती दराने आकारण्याबाबत पाठपुरावा करण्याचे ठरले.

मागील दोन वर्षे पावसाने दडी मारल्याने जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बहुतेक तलाव कोरडे पडून विहिरींनी तळ गाठला. यावर्षी ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे भूजल पातळी खालावली आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलावातील गाळ काढण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या तलावातून पूर्वी नगर शहराला पाणीपुरवठा केला जात होता. गाळ काढल्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. परंतु दमदार पाऊस न झाल्याने हा तलाव आजही कोरडाच आहे.

नैसर्गिक उद्भव कोरडे असल्याने जिल्ह्यातील दहातालुक्यांत सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टँकर संगमनेर व नगर तालुक्यात सुरू आहेत. पावणेतीन लाख जनता आजही टँकरवर अवलंबून आहे. संगमनेर 27, कोपरगाव 2, राहाता 9, नगर 19, पारनेर 3, पाथर्डी 21, शेवगाव 10, कर्जत 7, जामखेड 9 व श्रीगोंद्यात एका टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत होऊन टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याच्या सूचना अध्यक्ष लंघे यांनी सभेत दिल्या.

5 योजनांची कामे संथ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जिल्ह्यात 19 प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना मंजूर आहेत. पैकी बुर्‍हाणनगर, कोल्हार भगवतीपूर, चांदा, गळनिंब, शहर टाकळी, मिरी-तिसगाव, डोंगरवाडी, वैजूबाभुळगाव, कमलपूर - घुमनदेव, कान्हूरपठार, आखोणी, निमगाव गांगर्डा व पुणतांबा या तेरा योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. लोणी, आडगाव, पिंप्री निर्मळ, हातगाव या 5 योजनांची कामे धिम्या गतीने सुरू असून रांजणगाव देवी योजना न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली आहे. नव्याने सोनई-करजगाव पाणी योजना मंजूर झाली असल्याची माहिती सभेत देण्यात आली. प्रगतिपथावर असलेल्या योजना तातडीने पूर्ण कराव्यात, अशी सूचना अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. उपस्थित सदस्यांनी टँकरग्रस्त गावात नियोजित साखळी बंधार्‍यांची कामे तातडीने हाती घेण्याची मागणी केली. यावर उपस्थित सर्वांनी सहमती दर्शवली.

..तरच संख्या कमी होईल
नेवासे, पाथर्डी, जामखेड, शेवगाव, राहाता, कोपरगाव, नगर, कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांतील 257 टँकरग्रस्त गावांत लवकरच साखळी बंधारे बांधण्यात येणार आहेत. यापैकी 128 गावांत कृषी विभागामार्फत, तर 129 गावांत लघुपाटबंधारे विभागामार्फत बंधारे बांधण्यात येतील. या बंधार्‍याची कामे वेळेत झाली, तरच टँकरची संख्या कमी होईल.