आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चितळवाडीकरांची पाण्यासाठी भटकंती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - तालुक्यातील चितळवाडी येथील नळपाणी योजना मोडकळीस आल्याने चितळवाडी व कोठेवाडी भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
चितळवाडी व कोठेवाडीला एकच ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील टेबल, कपाटे तुटलेली असल्याने कार्यालयाचे दफ्तर व महत्त्वाची कागदपत्रे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. अनेक महिन्यांपासून या गावचे ग्रामसेवक कार्यालयाकडे फिरकलेलेच नाही. त्यामुळे ग्रामस्थांना लागणारी आवश्यक कागदपत्रेही मिळत नाही. गावासाठी लाखो रुपये खर्च करून नळयोजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीने वीजजोड तोडल्याने मोटार चालू नाही. याशिवाय या नळयोजनेचे काही पाईप चोरीस गेल आहेत, तर काही फुटल्याने नळ योजनाच बंद झाली आहे. त्यामुळे या भागात पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. याबाबत ग्रामस्थ गोरक्ष चितळे, पाराजी चितळे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी गटविकास अधिका-यांकडे तक्रारी केल्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे याबाबत तक्रार केली. या प्रकरणाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिका-यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची खातेनिहाय चौकशी करून विनाविलंब अहवाल पाठवण्याचे आदेश पंधरा दिवसांपूर्वीच गटविकास अधिका-यांना दिले आहेत.
ग्रामसेवकाची चौकशी करा - गेल्या अनेक दिवसांपासून गावात ग्रामसभा नाही. गटविकास अधिकारी तक्रारींची दखल न घेता भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालत आहेत. ग्रामसेवक, सदस्य व गटविकास अधिका-यांची चौकशी करावी.’’ - गोरक्ष चितळे, ग्रामस्थ