आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंदा तालुक्यावर दुष्काळाचे सावट, शेतीच्या पाण्यासह जनावरांचा चाराप्रश्नही ऐरणीवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - जिल्हा परिषद निवडणुकीच्या धामधूमीत कुकडी लाभक्षेत्रातील संभाव्य मोठ्या पाणीटंचाईचा सर्वांनाच विसर पडला आहे. कुकडीच्या पाच धरणांत 16 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असला तरी अजून पाच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. रब्बीचे दुसरे आवर्तन होणार की थेट उन्हाळी हंगामात पाणी मिळणार याचे नियोजन झाले नसल्याने शेतातील पिकांसह पिण्याचे पाणी व जनावरांच्या चा-याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे.
कुकडीतून रब्बीचे पहिले आवर्तन सोडून अडीच महिन्यांचा, तर बंद होऊन एक महिन्याचा काळ लोटला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला पडलेल्या जोरदार थंडीमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत झाली असली तरी आता संक्रतीनंतर उन्हाची वाढणारी तीव्रता पिकांसाठी धोकादायक ठरणार आहे. रब्बीच्या पहिल्या आवर्तनावेळी पुढच्या आवर्तनाचा निर्णय कालवा समितीने घेतलेला नव्हता. त्यामुळे पुढची आवर्तने नेमकी कशी सुटणार याविषयी खात्रीशीर माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळत नाही.
गेल्यावर्षी पावसाने सरासरीही ओलांडली नसल्याने यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक जाणार आहे, पण त्यापूर्वी रब्बी संपण्यास अजून दीड महिन्याचा काळ बाकी आहे. झेडपी निवडणुकीमुळे जरी राजकारण म्हणून हा प्रश्न पुढे आला तरी सद्या तरी या पाण्याच्या नियोजनाकडे नेतेमंडळी कार्यकर्ते गांभीर्याने पाहात नाहीत असे वाटते. 10 फेब्रुवारीच्या दरम्यान रब्बीतच पाण्याची भीषणता वाढणार आहे. त्याचे नियोजन आजच करावे लागणार असले तरी याबाबत पाटबंधारे विभागाला तशा कुठल्याच सूचना नसल्याने रब्बीत आवर्तन होणार की नाही याबाबतच आता शंका येऊ लागली आहे, जर रब्बीत आवर्तन झाले नाही तरी पिण्याच्या पाणी आरक्षणामुळे उन्हाळयातही शेतीसाठी दोन आवर्तने सुटणार नसल्याचे बोलले जात असल्याने फेब्रुवारीच्या किमान दुस-या आठवड्यात रब्बीचे दुसरे आवर्तन सोडण्याबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. अन्यथा कुकडी लाभक्षेत्रातील शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ येण्याची भीती आहे. दि. 5 नोव्हेंबरला सुटलेल्या व दि. 22 डिसेंबरला बंद झालेल्या रब्बीच्या पहिल्या आवर्तनाला दहा टीएमसी म्हणजे 25 टक्के एवढे विक्रमी पाणी लागले. तरीही बहुतेक ठिकाणचे ज्वारीचे पीक हाती न लागल्याने यंदा पाण्याबरोबर जनावरांच्या चा-याचाही प्रश्न डोके वर काढणार असल्याने शेतक-यांपुढे मोठे संकट भेडसावत आहे.
आवर्तनाचे नियोजन अद्याप नाही - कुकडीच्या पुढच्या आवर्तनाचे नियोजन अद्यापि ठरलेले नाही. याबाबत लाभक्षेत्रातील पाण्याची स्थिती व वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे हे नियोजन होईल. यंदा रब्बीत जास्त पाणी लागले असून गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास एक टीएमसी पाणीसाठा कमी आहे.’’ सर्जेराव पावसे, कार्यकारी अभियंता कुकडी प्रकल्प.
पाण्याचा प्रश्न गंभीर - गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा पिण्याचा पाणीप्रश्न व जनावरांच्या चा-याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. चाराडेपो सुरू करण्याबाबत चांभुर्डी परिसरातून तोंडी मागणी झाली आहे. ज्या ठिकाणी साखर कारखाने आहेत अशा ठिकाणी असे डेपो मार्चनंतर सुरू करण्याच्या सूचना असल्या तरी गरज पडल्यास प्रशासन तयारीत आहे.’’ - अनिल दौंडे,तहसीलदार.