आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचा पाणीपुरवठा झाला पुन्हा विस्कळीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पाच दिवसांपासून विस्कळीत झालेला शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (9 जून) काही प्रमाणात सुरळीत झाला होता. परंतु सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. शहर पाणी योजनेचा वीजपुरवठा सलग चौदा तास खंडित झाल्याने मुळानगर, विळद व नागापूर येथील पंपिंग स्टेशनमधून उपसा झाला नाही. त्यामुळे नगरकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
विस्कळीत झालेल्या पाणीप्रश्नासाठी आमदार अनिल राठोड यांनी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला 12 तासांची मुदत दिली होती. परंतु राठोड यांच्या आंदोलनाला राजकीय वळण लागल्याने पाणीप्रश्न मागे पडला. राठोड व महापौर संग्राम जगताप यांनी एकमेकांवर सलग तीन दिवस राजकीय चिखलफेक केली. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने वसंत टेकडी येथे नियोजन कक्ष स्थापन करून पाणी वितरणाचे योग्य नियोजन केले. ज्या भागाला तीन-चार दिवस पाणी मिळालेले नाही, त्या भागाला आधी व उर्वरित भागात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार सावेडीचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला होता. परंतु मध्यवर्ती शहर, पाइपलाइन रस्त्याचा काही भाग, केडगाव, बोल्हेगाव, मुकुंदनगर आदी भागांतील पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. या भागात टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्याचे प्रशासनाचे नियोजन होते, परंतु सोमवारी वादळी पावसामुळे पाणी योजनेचा वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला. त्यामुळे पाणी वितरणाचे नियोजन पुन्हा कोलमडले.

सोमवारी सायंकाळी 7 पासून मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पाणी योजनेचा वीजपुरवठा बंद होता. वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पाणीउपसा सुरू करण्यात आला, परंतु वसंत टेकडी येथे पूर्ण दाबाने पाणी येण्यास चार तास लागले. मंगळवारी दुपारी 2 पर्यंत वसंत टेकडी येथे पाणी येण्यास सुरुवात झाली. शहरात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांनी या प्रश्नाचे राजकीय भांडवल केल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.