आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीगळती रोखा, अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पाण्याचा थेंबन् थेंब वाचवण्याचा सल्ला देणार्‍या प्रशासनाकडूनच पिण्याच्या पाण्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी होत आहे. ही बाब ‘दिव्य मराठी’ने उजेडात आणल्यानंतर जिल्हा प्रशासनाला उपरती झाली आहे. टँकरमधून पाणीगळती होत असल्याचे मान्य करीत जिल्हाधिकार्‍यांनी ‘पाणीगळती रोखा; अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा,’ असा खणखणीत इशारा देणारे पत्र शनिवारी दुपारी टँकर ठेकेदारांना व प्रशासकीय अधिकार्‍यांना पाठवली आहेत. तथापि, आतापर्यंत झालेल्या पाणीगळतीचा हिशेब मात्र प्रशासनाकडे नाही.

बहुतांशी टँकरमधून पाणीगळती होत असून लाखो लिटर पाणी वाया जाते, हे ‘दिव्य मराठी’ने शनिवारच्या अंकात उजेडात आणले. नंतर प्रशासन खडबडून जागे झाले. टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांची व पाणी पुरवणार्‍या टँकरची इत्थंभूत आकडेवारी प्रशासनाकडे आहे. पण, आतापर्यंत किती पाणी वाया गेले, याचा हिशेब मात्र प्रशासकीय अधिकार्‍यांकडे नाही. 28 मार्चच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 339 दुष्काळग्रस्त गावांना व 1 हजार 396 वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते.

जिल्ह्यात एकूण 435 टँकरद्वारे हे पाणी वितरीत केले जाते. त्यापैकी 417 खासगी, तर 18 टँकर प्रशासनाचे आहेत. अर्थांत यापैकी सर्व टँकर गळके नसले, तरी खासगी कंत्राटदार काळजी घेत नसल्याने बहुतांशी टँकरची अवस्था खराब आहे. ही बाब प्रशासनाला देखील मान्य आहे. पण या गळक्या टँकरची आकडेवारी मात्र प्रशासनाकडे उपलब्ध नाही. टँकरला मंजुरी देण्यापूर्वीच त्यांच्या क्षमता व गुणवत्तेची चाचणी घेतल्याचे प्रशासन सांगते. मग या चाचणीतच गळके टँकर का सापडले नाहीत? आतापर्यंत जनतेच्या तोंडचे पाणी वाया घालवण्यास नेमके जबाबदार कोण? टँकरगळतीचा मुद्दा सत्ताधारी किंवा विरोधक कोणाच्याच लक्षात कसा आला नाही? गावागावात ग्रामसेवक व बचतगटाच्या महिला निगराणी ठेवतात, असे प्रशासन सांगते. मग क्षमतेपेक्षा कमी पाणी मिळत असल्याचे त्यांच्या लक्षात का आले नाही? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकणूाच, टँकरमधून गळालेल्या पाण्यात सगळ्यांचेच हात ‘ओले’ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकार्‍यांचा इशारा
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या टँकरला झाकणे बसवणे बंधनकारक आहे. पाणीगळती होत असलेल्या टँकरची तत्काळ दुरुस्ती करावी. टँकरमध्ये पाणी भरताना, त्या पाण्याची वाहतूक करताना व प्रत्यक्ष पाणी वितरित करताना पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. क्षमतेपेक्षा कमी पाणीपुरवठा केल्यास किंवा पाण्याचा अपव्यय झाल्यास संबंधित संस्थेवर दंडात्मक कारवाई केली जाईल. जिल्हाधिकार्‍यांच्या सहीचे हे इशारावजा पत्र पाचही खासगी टँकर्स संस्थांना, तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांना शनिवारी तत्काळ पाठवण्यात आले.

‘दिव्य मराठी’चे जनतेला आवाहन
पाण्याचा अपव्यय करणार्‍या टँकर्सवर दंडात्मक कारवाईचा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे. पण, पाणीगळतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्यामुळे गळक्या टँकर्सवर कारवाई व्हावी, यासाठी जनतेनेही डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे. यापुढे गळका टँकर दिसला, तर त्याबाबत (टँकरचा क्रमांक व शक्य असल्यास मोबाइलने काढलेला फोटो) टंचाई शाखेला (दूरध्वनी- 0241-2343600) व ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात पाठवावा. जेणेकरून 100 टक्के गळती रोखता येईल.