आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारनेर शहरास सहा दिवसांत एकदा पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - पावसाने दडी मारल्याने शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट वाढले आहे. पारनेर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणातील पाणीसाठय़ात समाधानकारक वाढ न झाल्याने शहराला सहा दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे. दरम्यान, पाऊस लांबल्याने तालुक्याच्या काही भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कायम दुष्काळाच्या वणव्यात होरपळणार्‍या पारनेर तालुक्याची दुष्काळाने यंदाही पाठ सोडलेली नाही. एप्रिल महिन्यापासूनच तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात प्रशासनाच्या वतीने टँकर सुरू करण्यात आले आहेत. सध्या तालुक्यातील 40 गावांना व 217 वाड्यांना 51 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात शासकीय 9 व खासगी 42 पाणी टँकर आहेत. अजूनही टँकरची मागणी वाढते आहे. मात्र सर्व उद्भव आटल्याने तालुक्याला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. 7 जूनला मान्सूनचा पाऊस दाखल होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण केली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना पावसाची आस लागली होती. मात्र जून महिन्यात एकही पाऊस न झाल्याने तालुक्यात खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. जुलै महिन्याच्या प्रारंभी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील भाळवणी, टाकळी ढोकेश्वर, पानोली, राळेगणसिद्धी, वडगाव, खडकवाडी, मांडवे, पळशी, कान्हूर पठार या भागात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र दक्षिण भागातील पारनेर, अळकुटी, निघोज, सुपा, बाबुर्डी, वडझिरे या भागात अजून एकही पाऊस न झाल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. कान्हूर पठार भागात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल केवळ वाटाणा पिकातून होते. यंदा मात्र पावसाने अल्प प्रमाणात हजेरी लावल्याने या भागात वाटाणा पिकाच्या केवळ 30 टक्के पेरण्या झाल्या आहेत.
जुलै महिन्याचे बारा दिवस उलटूनही तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईचे संकट कायम आहे. पारनेरला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मागणीप्रमाणे टँकर देणार - पाऊस लांबल्याने तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विहिरी, कूपनलिका अधिग्रहित करण्याचे काम हाती घेतले आहे. ज्या भागातून मागणी असेल, त्या भागाला तत्काळ टँकर देण्यात येत आहेत.’’ जे. आर. वळवी, तहसीलदार