आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणीटंचाईचे संकट अवघ्या तीन फुटांवर; मुळा धरणात अवघा तीन टक्के पाणीसाठा शिल्लक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुळा धरणात तीन टक्क्यांपेक्षा कमी उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. उपलब्ध 641 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आॅगस्टपर्यंत पुरणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी घटत्या पाणीपातळीमुळे उपसा क्षमतेवर परिणाम होणार आहे. त्यामुळे नगरकरांवर जलसंकट ओढवण्याची भीती आहे. सध्याचा पाणीसाठा तीन फुटांनी उतरल्यास उपसा क्षमतेवर परिणाम होईल.

वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने जिल्हाभर हजेरी लावली. मान्सूनचा पाऊस मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून गायब आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत मुळा धरणात अर्धा टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली होती. मात्र, यावर्षी धरणात नव्याने थोडेही पाणी आलेले नाही. मान्सूनच्या पावसाने पाठ फिरवल्याने मुळा धरणात सध्या अवघा 641 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यातच आणखी आठवडाभर पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उपलब्ध पाणी केवळ पिण्याच्या पाणी योजनांसाठी वापरण्यात येत आहे. बाष्पीभवन, गळती व धरणावर सुरू असलेल्या शहरासह बारा पाणी योजनांसाठी दररोज 10 ते 12 दशलक्ष घनफूट पाणी वापरले जाते. दररोजचा वापर लक्षात घेता 60 दिवस पुरेल इतकाच उपयुक्त पाणीसाठा सध्या धरणात आहे.

सध्या धरणातील पाण्याची पातळी 1755.30 फुटांपर्यंत कमी झाली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या पंपाचे फुटव्हॉल्व्ह 1735 फुटांवर आहेत. पंपिंग स्टेशनमधून 560 अश्वशक्तीचे 2 व 200 अश्वशक्तीचे 2 पंप नियमित सुरू आहेत. पाणीपातळी 1752 फुटांच्या खाली आल्यास पंपांची उपसा क्षमता खालावते. याच कारणावरून गेल्यावर्षी मे महिन्यात पाणीपातळी 1759 फुटांवर आल्यानंतर पाणीकपात लागू करण्यात आली होती. सध्या या पातळीच्या खाली पाणीसाठा पोहोचला आहे. आणखी तीन फुटांनी पाणीपातळी घटल्यास पाणी खेचण्याची पंपाची क्षमता कमी होईल. परिणामी पाणीकपातीचे संकट ओढावेल. मात्र, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पाऊस आणखी लांबल्यास उपनगरांतील पाणीटंचाईच्या संकटाचे लोण संपूर्ण शहरात पसरेल.

भंडारदरा धरणातही अवघा साडेसहा टक्के, तर निळवंडे धरणात केवळ एक टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
नियोजन केल्याने आॅगस्टपर्यंत पाणी पुरेल
मुळा धरणात सध्या 641 दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी आहे. पाणी योजनांसाठीच हा साठा राखीव आहे. या योजनांचा दररोजचा वापर लक्षात घेता आॅगस्टअखेरपर्यंत पाणी पुरेल. त्यादृष्टीने नियोजन आखण्यात आले आहे.’’
ए. एस. वडार, कार्यकारी अभियंता.
प्रमुख धरणांतील सध्याचा पाणीसाठा (दलघफू)
धरण क्षमता मृत उपयुक्त टक्केवारी
मुळा 26000 4500 641 2.98
भंडारदरा 11039 300 695 6.47
निळवंडे 212 135 189 1.06