आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्कळीत पाणीपुरवठा; खापर महावितरणवर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या अकार्यक्षम नियोजनशून्य कारभारामुळे नगरकरांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचा मनपाचा दावा आहे. मात्र, या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी मनपा प्रशासनाने अद्याप कोणतीच कार्यवाही केलेली नाही. अनेक भागात शेवाळमिश्रित गढूळ पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असतानाही मनपा प्रशासन आपल्या चुकांचे खापर महावितरणच्या माथी मारत आहे.

शहर पाणी योजनेवरील वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे वारंवार खंडित होतो. मागील आठवड्यात किती वेळा वीजपुरवठा खंडित झाला, याचे वेळापत्रक मनपाने जाहीर केले. खंडित वीजपुरवठ्यामुळे मुळानगर विळद येथील पंपिंग स्टेशनमधून पाणी उपसा करणे शक्य होत नाही. वीजपुरवठा पाच मिनिटांसाठी जरी खंडित झाला, तरी पाणीउपसा सुरळीत होण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. परिणामी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो, असा मनपाचा दावा आहे.

मात्र, मनपाकडे सक्षम यंत्रणा नसल्यामुळेच पाणीपुरवठा विस्कळीत होतो, असे महावितरणचे म्हणणे आहे. शिवाजीनगर भागातील नागरिकांनी चार दिवसांपूर्वीच पाण्यासाठी रास्ता रोको केला. केडगावतही सातव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. सावेडीत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. असे असतानाही मनपा आपल्या चुकांचे खापर महावितरणवर फोडत आहे. पाणी वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी मनपाने आतापर्यंत कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

शेवाळमिश्रित पाणी
सिव्हिलहडको, तसेच सावेडी उपनगरातील काही भागात शेवाळमिश्रित गढूळ पाणीपुरवठा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच टिळक रोड भागात दूषित पाणीपुरवठा सुरू होता. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांचे खोदकाम केल्यानंतर दूषित पाणीपुरवठा बंद झाला. आता इतर भागातही ही समस्या सुरू झाल्याने नागरिकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुन्हा दुरुस्ती
पाणीपुरवठायोजनेच्या महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी महािवतरणकडून शनिवारी (११ जुलै) सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी शहराचा पाणीपुरवठा पुन्हा िवस्कळीत होणार आहे. शनिवारी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर, स्टेशन रस्ता, मुकुंदनगर, केडगाव, कल्याण रस्ता भागात पाणीपुरवठा होणार नाही, तर रविवारीही उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

टँकरसाठीही पैसे
महापालिका शिवाजीनगर, सारसनगरसह विविध भागात टँकरने पाणीपुरवठा करत आहे. टँकरसाठी देखील नागरिकांना आठ दिवस वाट पहावी लागत आहे. टँकर आल्यावर प्रत्येक कुटुंबाकडून संबंधित टँकरचालक पैशांची मागणी करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पाण्याची गरज भागवण्यासाठी पैसे देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकीकडे पाणीपट्टी भरायची, अन् दुसरीकडे विकत पाणी घ्यायचे, ही शोकांतिकाच आहे.
बातम्या आणखी आहेत...