आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराच्या पाण्यासाठी पुन्हा पिंपळगाव तलावाचा पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहराला सन 1985 पर्यंत पिंपळगाव माळवी तलावातून पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर मुळा धरणातून करण्यात आलेल्या पाणी योजनेतून आजतागायत पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे नगरकरांना दिवसाआड पाणी मिळते. यावर पर्याय म्हणून पुन्हा एकदा पिंपळगाव माळवी तलावातून पाणी योजनेच्या पर्यायावर मनपात विचार सुरू आहे. या तलावातील गाळ काढून थेट शहरात पाणी आणण्यासाठी साडेतीन कोटींच्या खर्चाचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे.

इतिहासकालीन जलस्रोतांचे पुनरुज्जीवन केल्यास नगर शहराला मुबलक व कमी खर्चात पाणी मिळेल, असे ‘दिव्य मराठी’ने एक जानेवारी 2013 च्या अंकात मांडले होते. त्याला आता मूर्त स्वरूप मिळत आहे. पिंपळगाव माळवी तलावाची योजना 29 मार्च 1913 रोजी मंजूर झाली होती. या योजनेसाठी प्रत्यक्ष 17 लाख 84 हजार 894 रुपये खर्च आला. या योजनेसाठी सरकारकडून मिळालेल्या कर्जाचा हप्ता पालिकेच्या आटोक्याबाहेर असल्याने सरकारकडून हप्ता फेडीसाठी मुदतवाढ घेण्यासाठी प्रयत्न झाले. 1920-21 सालापासून शहरात याच तलावातून सकाळी सहा ते नऊ ते तसेच सायंकाळी चार ते सहा यावेळत पाणीपुरवठा होत होता. त्यानंतर 15 सप्टेंबर 1931 मध्ये पालिकेने ही योजना ताब्यात घेतली. त्यावेळी शहरात अंतर्गत जलवाहिन्या टाकून नळजोड देण्यात आले. दिवसेंदिवस नळजोडांची संख्या वाढून 1954-55 पर्यंत ती तीन हजारांपर्यंत पोहोचली. त्यातून त्यावेळी 72 हजार 720 रुपये उत्पन्न मिळत होते. त्यावेळी तलावाला मिळणार्‍या ओढय़ा-नाल्यांवर फारसे बंधारे नसल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरत होता. 1985 पर्यंत नगर शहराला या तलावातून पुरेसा पाणी पुरवठा होत होता. त्यानंतर मुळा धरणातून पाणी योजना सुरू झाली. दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येबरोबरच पाण्याची गरजही वाढत गेली. अपुरी साठवण क्षमता, अनधिकृत नळजोड, जुनी उपसा यंत्रणा यामुळे शहराला सध्या दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

त्यामुळे सुधारित ‘फेज दोन’ या पाणी योजनेतून नगरचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी प्रयत्न झाले. या योजनेचे पन्नास टक्के कामही पूर्ण झाले. पण जलवाहिन्या टाकण्याचे काम स्थानिकांच्या हरकतींमुळे प्रलंबित आहे. ही योजना पूर्णत्वाकडे जात असताना येणार्‍या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच, या योजना चालवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. यापेक्षा पिंपळगाव तलावातून पुन्हा एकदा पाणी पुरवठा योजना आणण्याचा विचार सुरू झाला आहे. या योजनेसाठी अडीच कोटी गाळ काढण्याचे व एक कोटी जलवाहिन्यांसाठी असा साडेतीन कोटींचा खर्च येणार असून मुळा धरणातील योजनेबरोबरच पिंपळगाव माळवी तलावातील पर्यायी पाणी योजना झाल्यास, पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. 2011 व 2012 या वर्षात दुष्काळात तलाव गाळ काढण्यासाठी खुला करून देण्यात आला होता.

निधी उपलब्ध झाल्यास काम सुरू
पिंपळगाव माळवी तलावापासून शहरात पाणी आणल्यास पाणीपुरवठय़ाचा नवा स्रोत निर्माण होणार आहे. तलावातील गाळ काढण्यासह थेट शहरात पाणी आणण्यासाठी साडेतीन कोटीचे अंदाजपत्रक आम्ही सादर केले आहे. पालकमंत्री मधुकर पिचड यांनी देखील योजनेसाठी सहमती दर्शवली आहे. जुने कालवे मजबूत करणे, दुरुस्ती करून शहरापर्यंत पाणी पोहोचणार आहे. निधी उपलब्ध झाल्यास तातडीने काम सुरू करण्यात येईल.’’ संग्राम जगताप, महापौर.

1 जानेवारी 2013 रोजी ‘दिव्य मराठी’ने इतिहासकालीन पाणी योजनांचे पुनरुज्जीवन करण्याकडे लक्ष वेधले होते.

जिल्हा नियोजनकडून अपेक्षा
महापौर संग्राम जगताप यांनी पालकमंत्री मधुकर पिचड यांची भेट घेऊन पिंपळगाव माळवी तलावाच्या पुनरुज्जीवनाबाबत चर्चा केली. तलावातील गाळ काढून स्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून निधी उपलब्धतेसाठी चर्चा झाली. यासाठी येणार्‍या साडेतीन कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले. त्यामुळे पर्यायी पाणीपुरवठय़ासाठी जिल्हा नियोजकडून नगरकरांना आशा आहे.

..तर 182.5 दशलक्ष घनफूट पाणी मिळणार
पिंपळगाव माळवी तलावाची जुने स्रोत पुनर्जीवीत केल्यास तलाव सहज भरू शकतो. गाळ काढल्यानंतर तलावाची साठवण क्षमता 182.5 दशलक्ष घनफूट होईल. तलावाच्या भौगोलिक रचनेमुळे उपसा करण्यासाठी येणारा विजेचा खर्च वाचेल. त्यामुळे सर्व इतिहासकालीन योजना व त्यांचे स्रोत पुनरुज्जीवित केल्यास पाणी पुरवठय़ासाठी आणखी पर्याय उपलब्ध होतील. ’’ चंद्रशेखर करवंदे, जलतज्ज्ञ