आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावमधील ६ हजार नळजोडांचा पेच कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव पाणी योजनेंतर्गत (फेज १) देण्यात येणाऱ्या ६ हजार २०० नवीन नळजोडांच्या कामासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेला थंड प्रतिसाद मिळाला आहे. या कामासाठी अवघी एक निविदा आली झाली आहे. ती देखील शंभर टक्के वाढीव दराने भरण्यात आली आहे. त्यामुळे नळाजोडांचा प्रश्न अजून काही दिवस तरी कायम राहणार आहे.

केडगाव पाणी योजनेंतर्गत नागापूर पंपिंग स्टेशन ते केडगाव ही १३ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी, ओंकारनगर, लोंढे मळा, मोहिनीनगर, जपेनगर येथील उंच टाक्यांचे काम, अंतर्गत जलवाहिन्या आदी कामे पूर्ण झाली, तरी अद्याप योजना कार्यान्वित झालेली नाही. योजनेंतर्गत ६ हजार २०० नवीन नळजोड देण्याचा प्रश्न वर्षभरापासून प्रलंबित आहे. या नळजोडांचा खर्च कोण करणार, असा प्रश्न मनपासमोर निर्माण झाला होता. अखेर हा खर्च नागरिकांवर थोपवण्यात आला, नळजोडाची पन्नास टक्के रक्कम रोख व पन्नास टक्के रक्कम मालमत्ता करातून कमी करून देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. त्यानंतर नळाजोडाच्या कामासाठी ऑगस्टमध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली, परंतु विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही निविदा प्रक्रिया लांबणीवर पडली होती.
आता ही निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असली, तरी या कामासाठी केवळ एकच निविदा आली आहे. ही निविदा देखील वाढीव दराने असल्याने ती मंजूर होणे कठीण आहे. त्यामुळे नळजोडांची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडणार आहे. केडगावमधील नागरिकांना सध्या सहा ते सात दिवसांनी पिण्याचे पाणी िमळते. त्यात जलवाहिनी फुटली, वीजपुरवठा खंडित झाला, तर नागरिकांना आठ-दहा दिवस पाणी िमळत नाही. त्यामुळे पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणे येथील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे अद्याप गांभीर्याने पाहिलेले नाही. माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात योजनेला गती िमळाली, परंतु त्यानंतर या कामास पुन्हा कासवगती आली आहे.

मुख्य जलवाहिनीचा आधार
पाणी योजनेंतर्गत नागापूर पंपिंग स्टेशन ते केडगाव या १३ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. मागील काही दिवसांपासून याच जलवाहिनीद्वारे केडगावला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. ही जलवाहिनी नसती, तर हा पाणीपुरवठा करणे देखील कठीण झाले असते. काही भागात अजूनही आठव्या दिवशी पाणी मिळते, त्यामुळे ही पाणी योजना पूर्ण होणे येथील नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे.

उपमहापौरांचा पाठपुरावा
उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी पाणी योजना पूर्ण होण्यासाठी सुरुवातीपासून पाठपुरावा केला. त्यामुळे योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. पाणी योजनेत नव्याने काही भागाचा समावेश करण्यात आला, त्यासाठी कोतकर यांच्या प्रयत्नाने सुमारे चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. सर्व कामे पूर्ण झाली असली, तरी नवीन नळजोडांची निविदा प्रक्रिया मात्र रखडली आहे. त्यामुळे योजना कार्यान्वित होण्याचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे.

रस्त्यांची कामे रखडली
नवीन नळजोडांचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत केडगाव उपनगरातील रस्त्यांची कामे देखील होणार नाहीत. नळजोडांच्या कामासाठी रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम होणार आहे. त्यामुळे आहे ते रस्ते देखील उखडले जाणार आहेत. नळजोडांचे काम पूर्ण झाल्यानंतर येथील रस्त्यांवर नव्याने डांबर पडेल, त्यामुळे नळजोडांची प्रक्रिया पूर्ण होऊन योजना कार्यान्वित होणे केडगावकरांसाठी महत्त्वाचे आहे.