आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Supply Issue In Nagar City Due To Coad Of Conduct

केडगावकरांना आचारसंहितेचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी लागू झालेल्या आचारसंहितेचा फटका केडगावातील सुमारे ७० हजार नागरिकांना बसला आहे. केडगाव पाणी योजनेंतर्गत (फेज १) देण्यात येणाऱ्या ६ हजार २०० नवीन नळजोडांच्या कामासाठी प्रसिद्ध केलेली निविदा आचासंहितेच्या जंजाळात सापडली आहे. त्यामुळे केडगावकरांसमोर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर संदीप कोतकर यांनी मोठ्या थाटात या योजनेचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर महापालिकेच्या दोन निवडणुका झाल्या, परंतु केडगावकरांच्या नशिबी अजूनही पाणीटंचाई आहे. त्यामुळे नागरिक महापालिकेच्या कारभारा विरोधात संताप व्यक्त करत आहेत.
पाणीप्रश्नाचे भांडवल करत राजकारण्यांनी आतापर्यंत अनेक निवडणुका जिकल्या, तरीदेखील नागरिकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळालेले नाही. तत्कालीन महापौर संदीप कोतकर यांनी केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत सुमारे ४४ कोटींची केडगाव पाणी योजना मंजूर करून आणली. ५ ऑक्टोबर २००८ रोजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते मोठ्या थाटात या कामाचे भूमिपूजन झाले. परंतु केडगावकरांसाठी ही योजना म्हणजे केवळ मृगजळ ठरली आहे. सहा वर्षे उलटली, तरी पाणी मिळालेले नाही.

नागापूर पंपिंग स्टेशन ते केडगाव ही १३ किलोमीटरची मुख्य जलवाहिनी, ओंकारनगर, लोंढे मळा, मोहिनीनगर, जपेनगर येथील उंच टाक्यांचे काम, अंतर्गत जलवाहिन्या आदी कामे पूर्ण झाली, तरी अद्याप योजना कार्यान्वित झालेली नाही. योजनेंतर्गत ६ हजार २०० नवीन नळजोड देण्याचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहे. या नळजोडांचा खर्च करणार कोण असा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला आहे. हा खर्च नागरिकांवर थोपवण्यात आला असला, तरी त्याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या कामासाठी ऑगस्ट महिन्यात निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा उघडल्यानंतर त्यास स्थायी समितीची मंजुरी घ्यावी लागणार आहे. परंतु आता आचारसंहितेमुळे निविदा मंजुरीसाठी स्थायीची सभा बोलावणे शक्य होणार नाही. त्यामुळे नळजोडांचे काम पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. योजनेचे हक्काचे पाणी पिण्यासाठी येथील नागरिकांना आता २०१५ या वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल.
केडगावमधील नागरिकांना सध्या चार-पाच दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. जलवाहिनी फुटली, वीजपुरवठा खंडित झाला, तर आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणे येथील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे अद्याप गांभीर्याने पाहिलेले नाही. माजी महापौर शीला शिंदे यांच्या कार्यकाळात योजनेला गती मिळाली, परंतु त्यानंतर या कामास पुन्हा कासवगती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या योजनेच्या हक्काच्या पाण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणाार, असा प्रश्न सुमारे ७० हजार केडगावकरांसमोर निर्माण झाला आहे.

जलवाहिनीचा आधार
नागापूर पंपिंग स्टेशन ते केडगाव या १३ किलोमीटरच्या मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. याच जलवाहिनीद्वारे केडगावला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. ही जलवाहिनी नसती, तर हा पाणीपुरवठा करणे कठीण झाले असते, असे एका अधिकाऱ्याने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितसे. योजना कार्यान्वित करण्यासाठी कोणत्याही मोठ्या अडचणी नाहीत. नळजोडणी झाल्यानंतर योजना कार्यान्वित करता येईल. नळजोडणीच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे, परंतु आता आचारसंहितेमुळे हे काम लांबणीवर पडणार असल्याचे मनपाच्या या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकारीच अनभिज्ञ
केडगाव पाणी योजनेसाठी शासनाकडून ४ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी सांगितले. मात्र, हा निधी कोणत्या कामासाठी मंजूर झाला व तो कधी मिळणार, याबाबत एकाही अधिकाऱ्यास माहिती नाही. शासनाने अनेकदा निधी दिला, तरी काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिक संतापले व्यक्त करत आहेत. एकीकडे शहराला दिवसाआड मुबलक पाणी मिळत आहे, तर दुसरीकडे येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, विशेष म्हणजे त्यांची ही वणवण एक-दोन नव्हे, तर तब्बल २५ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पाणी योजनेचे महत्व मोठे आहे.

काम संथ गतीने
केडगावच्या पाणीप्रश्नासाठी २५ वर्षांपासून लढा सुरू आहे. आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी अपूर्ण कामाचे उदघाटन करून नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक केली. मुळात या सत्ताधाऱ्यांना योजना पूर्ण करायचीच नाही. केवळ कामाचे भिजत घोंगडे कायम ठेवून त्याचा वापर राजकारणासाठी करायचा आहे. शासनाकडून योजनेसाठी अमुक निधी आणल्याचे हे सांगतात, मग निधी असतानाही योजनेचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही?” शिवाजी लोंढे, माजी नगरसेवक