आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या झालेल्या जलवाहिन्यांतून दूषित पाणी, महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - चार दशकांपूर्वीच्या जुन्या जीर्ण झालेल्या शहरातील जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. शिवाय त्यापैकी काही जलवाहिन्या चक्क गटारींमध्ये असल्याने नागरिकांना सध्या दूषित पाणी मिळत आहे. मनपा प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
सावेडी, सिव्हिल हडको, बालिकाश्रम रस्ता, भिस्तबाग, तारकपूर, सावेडी गावठाण, भुतकरवाडी, पोलिस वसाहत, टिळक रस्ता आदी भागातील नागरिकांना वारंवार दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या भागातील अनेक जलवाहिन्या गटारींमधून गेलेल्या असून त्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गळतीच्या ठिकाणी गटारींमधील दूषित पाणी या जलवाहिन्यांमध्ये जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडे जावे, तर त्यांच्याकडूनही गोलमाल उत्तरे देऊन नागरिकांची बोळवण केली जाते.

शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था चार दशके जुनी झाल्याने ती आता निकामी झाली आहे. जलवाहिन्या जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मनपाने ११६ कोटी रुपयांची शहर सुधारित पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. मात्र, या योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना आणखी काही वर्षे गळती दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. "फेज टू'च्या योजनेबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांची दखल अजून प्रशासनाने घेतलेली नाही.

शहरात सुमारे २२ ओढे-नाले असून या नाल्यांमधूनही अनेक जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. वर्षानुवर्षे या ओढे-नाल्यांची सफाई होत नाही. त्यामुळे नाले तुंबले असून त्यातील जलवाहिन्यांची गळती लक्षात येत नाही. पाणी पुरवठा विभागाकडूनही गळती असलेल्या जलवाहिन्यांचा शोध घेतला जात नाही. त्यामुळे नाले गटारींमधील दूषित पाणी जलवाहिन्यांमध्ये जात आहे. त्यामुळे शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित महापालिका अधिकारी पदाधिकारी मात्र उघड्या डोळ्यांनी हा तमाशा पहात आहेत.

दोन वर्षांपूर्वी आगरकर मळा परिसरात मोठ्या प्रमाणात काविळीची साथ पसरली होती. दूषित पाण्यामुळे हजारो नागरिकांना काविळीला तोंड द्यावे लागले होते. त्यात एक-दोन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. दूषित पाण्याचा शोध घेताना महापालिका कर्मचाऱ्यांच्या चांगलेच नाकीनव आले होते. सध्याही काही भागात गॅस्ट्रोचे रुग्ण आढळत असून पावसाळ्यात हे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे गटारींमधून गेलेल्या जलवाहिन्यांच्या गळतीकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. भविष्यात दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागू नये, एवढीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

ड्रेनेजमुळे दूषित पाणी
वैदूवाडी, झेंडीगेट, सर्जेपुरा, सिध्दार्थनगरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या ड्रेनेजलाइन एकाच ठिकाणी आहेत. ड्रेनेजची झाकणे उघडीच आहेत. त्यामुळे दुर्गंधी तर आहेच, शिवाय ड्रेनेजची घाण थेट जलवाहिनीत जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

जलवाहिन्या हरवल्या झाडाझुडपांमध्ये
सिव्हिल हडको, स्टेशन रोड, सावेडी आदी ठिकाणी नाल्यांमधून गेलेल्या जलवाहिन्या झाडाझुडपात हरवल्या आहेत. पानवेली, रानगवत शेवाळाने जलवाहिन्या झाकल्या आहेत. त्यामुळे जलवाहिनींची गळती शोधणे कठीण झाले आहे. त्यात मनपाचे संबंधित कर्मचारी त्याकडे ढुंकूनही पहात नाहीत. त्यामुळे दूषित पाणी पिणे हा एकमेव पर्याय नागरिकांना उपलब्ध आहे.
बातम्या आणखी आहेत...