आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केडगावकरांना हवंय आता दिवसाआड पाणी, थोड्याव दिवसांत होणार पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दहा-बारावर्षांपासून पाणी टंचाईला वैतागलेल्या केडगावकरांना लवकरच पुरेसे पाणी मिळणार आहे. केडगाव पाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहिन्यांवर नळजोड देण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता आम्हाला मध्यवर्ती शहर सावेडीप्रमाणे दिवसाआड पाणी द्या, अशी मागणी केडगावकर करत आहेत. उर्वरित ६०० ते ७०० नळजोडांचे काम प्रगतिपथावर असून ते पूर्ण होताच केडगाव पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. त्यानंतर केडगावला दिवसाआड पाणीपुरवठा होईल.
नवी पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी सुमारे पाऊण लाख लोकसंख्या असलेल्या केडगाव उपनगराला अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली. तत्कालीन महापाैर संदीप कोतकर यांच्या कार्यकाळात मंजुरी झालेल्या या कामात अनेक अडचणी आल्या. तत्कालीन उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी रखडलेल्या योजनेस गती दिली. नवीन जलवाहिन्यांवर नळजोड देण्याचे काम रखडले होते. नळजोडासाठी होणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. मनपाची अार्थिक परिस्थिती नाजूक असल्याने हा खर्च नागरिकांकडून घेण्यात आला. नागरिकांनीही आढेवेढे घेता नळजोडाचा खर्च दिला.

केडगाव उपनगरात एकूण हजार २०० नळजोड आहेत. नव्या जलवाहिन्यांवर आता हे नळजोड देण्यात आले आहेत. सुमारे एक हजार नागरिकांनी नव्याने नळजोडासाठी अर्ज केले आहेत. असे एकूण हजार ७०० नळजोड देण्यात येणार आहेत. त्यापैकी हजार ५०० नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७०० नळजोडांचे काम प्रगतिपथावर आहे. हे काम येत्या महिनाभरात पूर्ण होताच अनेक दिवसांपासून रखडलेली ही पाणी पुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकेल.
‘फेज टू’चा केडगाव पाणी योजनेला फटका
केडगाव पाणी योजना पूर्णत्वास आली असली, तरी जोपर्यंत शहर सुधारित पाणीपुरवठा याेजनेंतर्गत (फेज टू) मुळा नगर विळद येथे जास्त क्षमतेचे विद्युतपंप बसत नाहीत, तोपर्यंत केडगाव पाणी योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार नाही. केडगाव ते नागापूर अशी १३ किलोमीटर लांबीची स्वतंत्र पाण्याची पाइपलाइन करण्यात आली आहे. त्यामुळे मुळानगर येथून उपसा झालेले पाणी नागापूर येथून केडगावला देण्यात येणार आहे. केडगाव पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी ‘फेज टू’ची कामे तातडीने होणे गरजेचे आहे.

सध्या मिळते चार दिवसांनंतर पाणी
केडगाव उपनगरातील पाणीप्रश्न गंभीर झाला होता. दहा-बारा दिवसांनंतर पाणी मिळायचे. मागील वर्षभरात येथील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. नवीन जलवाहिन्यांवर नळजोड देण्यात आले असून त्याद्वारे पाणीपुरवठादेखील सुरू झाला आहे. आता चार दिवसांनंतर पाणी दिले जाते. त्यामुळे केडगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी दिवसाआड पाणी मिळावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
बातम्या आणखी आहेत...