आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फेज टू' चा तिढा : सत्ताधार्‍यांसह मनपा प्रशासनही अजून गप्पच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहर सुधारित पाणी योजनेचे (फेज टू) काम बंद होऊन तब्बल पाच आठवडे उलटले. बंद पडलेले काम पुन्हा सुरू व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी अद्याप कोणतेच प्रयत्न केले नाहीत. शहराचे कर्तेधर्ते आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांनीदेखील पाणी योजनेच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे ११६ कोटी रुपयांच्या या योजनेचे काम कायमचेच बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.

केंद्र शासनाच्या यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत हाती घेतलेल्या फेज टू योजनेचे काम गेल्या पाच आठवड्यांपासून बंद आहे. महापालिकेचे असहकार्य नऊ कोटी रुपयांची थकीत बिले मिळत नसल्याने ठेकेदार संस्था तापी प्रिस्टेजने हे काम थांबवले आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर प्रतिमाणसी १५० ते १६० लिटर दररोज पाणी मिळणार आहे. परंतु योजनेचे काम सुरू होऊन साडेचार वर्षे उलटले, तरी केवळ ४० ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. ठेकेदार संस्थेला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली, परंतु योजनेचे काम पुढे सरकलेच नाही. आता तर ठेकेदार संस्थेने काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनासह सत्ताधारी अडचणीत सापडले आहेत. काम बंद झाले नसून ते सुरूच आहे, आठ दिवसांत काम सुरू होईल, चर्चा सुरू आहे, काम बंद होऊ देणार नाही, अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरे प्रशासन सत्ताधारी देत आहेत. विरोधकांनी काम सुरू झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला, परंतु त्यांचा हा इशाराही हवेतच विरला. त्यामुळे महत्त्वाकांक्षी पाणी योजनेचे काम पुन्हा सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ठेकेदार संस्था प्रकल्प व्यवस्थापन समितीचे थकीत बिले देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कोणत्याच हालचाली नाहीत.

महापौर जगताप हे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र होते. आता ही निवडणूक झाली असल्याने जगताप बंद झालेले योजनेचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलतील, अशी नगरकरांची अपेक्षा आहे.

विरोधकांचे आंदोलन ?
विरोधी शिवसेना-भाजप नगरसेवकांनी महिनाभरापूर्वी आठ दिवसांत काम सुरू झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांना या इशार्‍याचा विसर पडला. वृत्तपत्रांत बातम्या छापून आल्यानंतर या नगरसेवकांनी प्रशानाला पुन्हा दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. दोन दिवसांनंतर त्यांनी दिलेली मुदत संपणार आहे. त्यामुळे विरोधक आता आंदोलन करून पाणी योजनेच्या बंद पडलेल्या कामाबाबत सत्ताधारी प्रशासनाला जाब विचारणार का, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.

२० कोटींच्या निविदेमुळे काम बंद
योजनेच्या काही कामासाठी पुन्हा २० कोटी रुपयांची निविदा मंजूर करण्याचा घाट सत्ताधार्‍यांनी घातला. जुन्या ठेकेदाराशी झालेल्या करारनाम्याचा भंग करून, तसेच शासनाची परवानगी घेता ही निविदा मंजूर करण्यात आली. त्यात कोट्यवधी रुपयांची टक्केवारी सत्ताधार्‍यांनी लाटली असून या प्रकारामुळेच योजनेचे काम बंद झाल्याची चर्चा आहे. ठेकेदार संस्था काम करण्यास तयार झाली नाही, तर मनपाला दुसर्‍या ठेकेदार संस्थेची शोधाशोध करावी लागणार आहे. परंतु अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी एखादी ठेकेदार संस्था तयार होईल, याबाबतही शंकाच आहे.
बातम्या आणखी आहेत...