आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याच्या उंच टाक्या होतात ‘आपोआप’ स्वच्छ! पाणीपुरवठा विभागाचा जावईशोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - वसंत टेकडी येथील पंपहाऊस 20 दिवसांपूर्वीच स्वच्छ केले, परंतु शहरातील विविध भागात असलेल्या पाण्याच्या उंच टाक्या स्वच्छ करण्याची गरज पडत नाही. पाण्याच्या आवक-जावकमुळे या टाक्या आपोआप स्वच्छ होतात, असे हास्यास्पद स्पष्टीकरण महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील एका जबाबदार अभियंत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सोमवारी दिले. यावरून टाक्यांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत पाणीपुरवठा विभाग किती दक्ष आहे, ते स्पष्ट झाले. विशेष म्हणजे वसंत टेकडी येथील पंपहाऊस वगळता इतर उंच टाक्या यापूर्वी कधी स्वच्छ केल्या, याची कोणतीच माहिती या विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे महापालिका नगरकरांच्या मरणाची खरोखरच, तर वाट पाहत नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नगरकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पाणीप्रश्नाकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. पाण्याच्या ज्या टाक्यांमधून लाखो नागरिकांची दररोजची तहान भागते, त्या टाक्यांची गेल्या अनेक वर्षांपासून वेळेवर स्वच्छता होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहर व उपनगरांना दहा उंच टाक्यांतून पाणीपुरवठा केला जातो. एका टाकीची साठवण क्षमता सुमारे 22 लाख लिटर आहे. सध्या एका व्यक्तीला एक दिवसाआड सरासरी 70 ते 85 लिटर पाणी मिळते. परंतु प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत येणार्‍या या पाण्याचा प्रवास धोकादायक पध्दतीने होतो. सर्वात मोठा धोका उंच टाक्यांमुळे निर्माण झाला आहे. अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या या टाक्यांमध्ये लाखो लिटर पाणी साठवले जाते, परंतु साठवलेले हे पाणी निर्जंतूक करण्यासाठी महापालिका कोणत्याच उपाययोजना करत नाही. विळद येथील जलशुध्दीकरण केंद्रात टीसीएल पावडरद्वारे पाणी स्वच्छ केले जाते. त्यानंतर हे पाणी उंच टाक्यांमध्ये साठवले जाते. परंतु टाक्यांची स्वच्छता होत नसल्याने हे पाणी पुन्हा दूषित होते. ते तसेच नागरिकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे टाक्यांची वेळोवेळी स्वच्छता होणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. परंतु या महत्त्वपूर्ण बाबीकडे प्रशासनाचे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे.

टाक्यांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत पाणीपुरवठा विभाग उदासीन आहे. टाक्यांची सुरक्षा कशी रामभरोसे आहे, ते ‘दिव्य मराठी’ने सोमवारी उघड केले. टाक्यांच्या स्वच्छतेबाबतही तीच अवस्था आहे. टाक्या स्वच्छ करण्याची नियमावली काय आहे, अशी विचारणा पाणीपुरवठा विभागाच्या एका जबाबदार अभियंत्याकडे केली असता ‘नियमावली काहीच नाही. आम्ही 20 दिवसांपूर्वीच वसंत टेकडी येथील पंपहाऊस स्वच्छ केले. इतर उंच टाक्या स्वच्छ करण्याची गरजच पडत नाही. पाण्याच्या आवक-जावकीमुळे त्या आपोआप स्वच्छ होतात,’ असे उत्तर त्यांनी दिले.

जबाबदार अधिकार्‍याच्या या उत्तरावरून टाक्यांची सुरक्षा व स्वच्छतेबाबत पाणीपुरवठा विभाग किती दक्ष आहे, ते स्पष्ट झाले.
वितरण व्यवस्था चार दशके जुनी..खासगी संस्थांना काम द्या
शहरात अनेक संस्था आहेत, ज्या उंच टाक्यांची स्वच्छता करू शकतात. त्यामुळे हे काम खासगी संस्थांमार्फत करावे, असे मत काही नागरिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले. सैन्य दलातील काही निवृत्त जवान ‘मेस्को’ नावाची संस्था चालवतात. या संस्थेला टाक्यांची सुरक्षा व स्वच्छतेचे काम दिले, तर नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल, असेही काही नागरिकांनी सांगितले.
काय आहे नियमावली
- शहरातील सर्व उंच टाक्या किमान 3 महिन्यांतून एकदा स्वच्छ करणे बंधनकारक आहे.
- टाक्या स्वच्छ केल्यानंतर त्या निर्जंतूक करण्यासाठी औषध फवारणी आवश्यक आहे.
- टाक्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेकडे स्वच्छतेसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी.
- पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांनी वेळोवेळी टाक्यांची पाहणी करावी.
- टाक्यांमधील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच ते वितरित होणे गरजेचे आहे.
- प्रत्येक टाकीच्या ठिकाणी फलक लावून त्यावर स्वच्छ केल्याची तारीख लिहावी.
जीवन-मरणाचा प्रश्न
* पाणी हा नागरिकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे महापालिका कर्मचार्‍यांनी इतर शंभर कामे केली नाहीत तरी चालेल, परंतु पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा व स्वच्छतेचे काम आधी करायला हवे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा मनपाला कोणताच अधिकार नाही.’’
- भगवान फुलसौंदर, माजी महापौर.
कुणालाच देणे-घेणे नाही
* पाण्याच्या उंच टाक्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न मी उपस्थित केला होता. परंतु त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. महापालिका प्रशासन व सत्ताधार्‍यांना त्याचे काहीच देणे-घेणे नाही. टाक्यांची सुरक्षा व स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून ते खुशाल लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.’’
- शिवाजी लोंढे, माजी नगरसेवक.
आयुक्तांचा गलथान कारभार
* आयुक्तांच्या गलथान कारभारामुळे महापालिकेला बधिरता आली आहे. त्यामुळे कर्मचारी व इतर अधिकार्‍यांना मस्ती चढली असून ते नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. टाक्यांमधील दूषित पाणी पैसेवाले लोक फिल्टर करून घेतील, परंतु गोरगरीब जनतेने काय करायचे?’’
- श्याम असावा, सामाजिक कार्यकर्ते.
छायाचित्र - नगर शहरातील अशा उंच टाक्यांची मनपा स्वच्छता करत नाही. छाया : कल्पक हतवळणे