आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपा पाहतेय नगरकरांच्या मरणाची वाट! पिण्याच्या उंच टाक्यांची सुरक्षा रामभरोसे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरकरांकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा कर वसूल करणाºया महापालिकेचे पिण्याच्या उंच टाक्यांच्या सुरक्षेकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाले आहे. एखाद्या माथेफिरूने घातपात करण्याच्या हेतूने टाक्यांमध्ये प्राणघातक रसायन टाकले, तर लाखो नागरिकांच्या जिवाचा प्रश्न निर्माण होईल. ‘दिव्य मराठी’ने शहरातील विविध भागांत असलेल्या सात टाक्यांच्या सुरक्षेची पाहणी केली असता पाच टाक्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला. सुरक्षा तर दूरच या टाक्यांची वर्षानुवर्षे स्वच्छतादेखील होत नाही. महापालिका नगरकरांच्या मरणाची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे.
शहरातील लाखो नागरिकांना सात उंच टाक्यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. वसंत टेकडी, लाल टाकी, आरटीओ कार्यालय, सरोश बाग, आयुक्तांचे निवासस्थान व नवीन मनपा कार्यालय या परिसरात या टाक्या आहेत. मुळा धरणातून उपसा केलेले पाणी या टाक्यांमध्ये साठवून ते शहराला पुरवले जाते. एका टाकीमध्ये सुमारे 22 लाख लिटर पाणी साठवले जाते. साठवलेल्या या पाण्याच्या सुरक्षेसाठी महापालिकेने कोणतीच व्यवस्था केलेली नाही. सातही टाक्यांची सुरक्षा सध्या तरी रामभरोसे आहे. प्रत्येक टाकीच्या सुरक्षेसाठी एका कर्मचाºयाची नेमणूक करण्यात आली असून ते तीन शिफ्टमध्ये टाक्यांची सुरक्षा करतात, असे महापालिका प्रशासन सांगते. प्रत्यक्षात मात्र एकही कर्मचारी टाक्यांच्या सुरक्षेसाठी पूर्णवेळ उपस्थित नसतो. त्यामुळे एखाद्या माथेफिरूने घातपात करण्याच्या हेतूने टाक्यांमध्ये प्राणघातक रसायन टाकले, तर शहरातील लाखो नागरिकांच्या जिवाचा प्रश्न निर्माण होईल.
महापालिकेचा हा ढिसाळ कारभार नागरिकांना कळावा, यासाठी ‘दिव्य मराठी’ने सातही टाक्यांची पाहणी केली. आरटीओ व नवीन मनपा कार्यालय परिसरातील दोन टाक्या वगळता इतर पाच टाक्यांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी उपस्थित नव्हते. काही ठिकाणी तर दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसल्या. त्यामुळे टाक्यांची सुरक्षा कशी होत असेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनपाचे सुरक्षा कर्मचारी सकाळी आठ ते दुपारी चार, दुपारी चार ते रात्री बारा व रात्री बारा ते सकाळी आठ अशा शिफ्टमध्ये टाक्यांची सुरक्षा करत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत हा दावा फोल ठरला. रात्री तर सोडाच, दिवसादेखील कर्मचारी उपस्थित नस याने टाक्यांच्या सुरक्षेचा गंंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
7 टाक्यांतून असा होतो शहराला पाणीपुरवठा
वसंत टेकडी : पाइपलाइन रस्ता, सावेडी उपनगरासह शहर.
लाल टाकी : सिध्दार्थनगर, तोफखाना, बागरोजा हडको, दातरंगे मळा.
सरोश टाकी : झेंडी गेट, कोठला परिसर, डावरे गल्ली, दाळ मंडई आदी.
मनपा कार्यालय : येथील दोन टाक्यांतून तारकपूर, बोरुडे मळा, तोफखाना, नालेगाव, सर्जेपुरा, माळीवाडा आदी भागांना पाणीपुरवठा होतो.
जीएसआर टाकी : आयुक्तांच्या निवास्थानाजवळील जीएसआर टाकीतून विविध भागांत सुमारे 68 लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो.
आरटीओ टाकी : या टाकीतून कापडबाजार, ख्रिस्त गल्ली, माळीवाडा, झेंडी गेट, दाळ मंडई आदी भागाला पाणीपुरवठा होतो.
परिमल निकम (पाणीपुरवठा विभागप्रमुख)
प्रश्न : टाक्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना आहेत?
निकम : सर्व टाक्यांच्या सुरक्षेसाठी कर्मचाºयांची नेमणूक केलेली आहे.
प्रश्न : एकूण किती सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत?
निकम : नक्की किती सुरक्षा कर्मचारी आहेत, ते या वेळी मला सांगता येणार नाही...
प्रश्न : सुरक्षा कर्मचारी टाक्यांजवळ थांबतात का?
निकम : हो. सर्व कर्मचार्‍यांना तसे आदेश आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना थांबावेच लागते.
प्रश्न : सुरक्षाकर्मचारी तेथे थांबत नाहीत हे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत आढळून आले.
निकम : असे होणार नाही. तुम्ही चुकीच्या वेळी पाहणी केली असेल...
सुरक्षा कर्मचारी करारावर
टाक्यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले बहुतेक कर्मचारी सहा महिन्यांच्या करारावर घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे कर्मचारी पूर्णवेळ टाक्यांची सुरक्षा करत नाहीत. आपण जर कायम कर्मचारी नाही, तर सुरक्षेची एवढी काळजी कशाला करायची, अशी भावना या कर्मचाºयांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे हे कर्मचारी स्वत:ची खासगी कामे करून मगच टाक्यांची सुरक्षा करतात. काही कर्मचारी तर दोन-तीन दिवस या टाक्यांकडे फिरकतही नाहीत. असे असतानाही पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी टाक्यांची सुरक्षा योग्य पद्धतीने होत असल्याची अनेक वर्षांपासून बतावणी करत आहेत. विशेष म्हणजे याबाबत पदाधिकारीदेखील काहीच बोलत नाहीत.
तेथे पार्ट्या व जुगाराचे डाव
सुरक्षा कर्मचारी नसल्याने टाक्यांच्या आवारात, तसेच काही टाक्यांच्या छतावर दारू व जुगाराच्या पार्ट्या रंगतात. काही ठिकाणी युवक-युवतींचे प्रेमाचे चाळे सुरू असतात. शहरातील लाखो नागरिकांची तहान भागवणार्‍या या टाक्यांचा वापर सर्रास अशा कामांसाठी होत असताना महापालिका प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांची नेमणूक केवळ कागदोपत्री आहे. तीन शिफ्टमध्ये हे कर्मचारी टाक्यांची सुरक्षा योग्य पद्धतीने करतात की नाही, याची आतापर्यंत अधिकारी व पदाधिकार्‍यांनी साधी पाहणी देखील केलेली नाही. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. एखादी दुर्दैवी घटना घडली, तरच महापालिकेला जाग येईल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.