आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Tanker And Gps Issue At Nagar, Divya Marathi

पाण्याच्या टँकरना जीपीएस यंत्रणेचे वावडे, शासनाचा अध्यादेश धुळखात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - टँकरच्या खेपांतील गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य शासनाने टँकरला जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आदेश सर्व जिल्हाधिका-यांना दिले होते. मात्र, याबाबत टँकरचालकांमध्ये उदासीनता आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या 365 पैकी एकाही टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्यात आलेली नाही.

दोन वर्षांपूर्वी पावसाने दडी मारल्याने गंभीर दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने त्यावेळी 600 टँकर सुरू केले होते. टँकरच्या खेपांमध्ये गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी त्यावेळी आणि पूर्वीही येत होत्या. टँकरचालकांनी कुठल्या गावात किती खेपा द्यायच्या, हे प्रशासनाने निश्चित केले होते. मात्र, टँकरचालक जास्त खेपा दाखवून बोगस बिले वसूल करत होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर 4 जानेवारी 2014 रोजी शासनाने पत्रिपत्रक काढून टँकरला जीपीएस यंत्रणा बसवणे सक्तीचे केले. ज्या टँकरला जीपीएस यंत्रणा बसवण्यात आलेली नाही, त्याच्या खेपा बनावट धरून बिल अदा न करण्याचे आदेश शासनाने प्रशासनाला दिले होते.

मालेगावच्या अतिरिक्त जिल्हाधिका-यांवर इंधन माफियांनी रॉकेल टाकून त्यांना पेटवले. या घटनेनंतर शासनाने इंधनवाहक वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पाण्याच्या टँकरच्या खेपांमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांनाही जीपीएस यंत्रणा बसवण्याचे निर्देश दिले गेले.

करारपत्रात स्पष्ट आदेश
जीपीएस यंत्रणा बसवण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. टँकरचा ठेका देताना संबंधित ठेकेदाराच्या करारपत्रात जीपीएस यंत्रणा बसवण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व टँकर ठेकेदारांना जीपीएस यंत्रणा बसवण्यासाठी लेखी पत्र दिले आहेत.’’
अनिल कवडे, जिल्हाधिकारी.

अशी कार्यान्वित होते जीपीएस यंत्रणा
कोणत्याही वाहनात ही यंत्रणा बसवता येते. हे काम इंटरनेटच्या माध्यमातून चालते. या यंत्रणेचे सर्व्हर प्रमुख कार्यालयात बसवण्यात येते. सॅटेलाईटच्या माध्यमातून वाहन कुठल्या भागात आहे ते कार्यालयात बसवण्यात आलेल्या संगणकावर संदेशाच्या माध्यमातून समजते. संबंधित वाहन किती वेळा कुठल्या भागात फिरले याची माहिती मिळते.