आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टँकरमधून गळतंय जनतेच्या तोंडचं पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र स्वरूपाच्या टंचाईमुळे पाण्याचा प्रत्येक थेंबन् थेंब वाचवण्याचा सल्ला दिला जात आहे, पण प्रत्यक्षात प्रशासनाकडूनच पाण्याची मोठय़ा प्रमाणावर नासाडी होत आहे. दुष्काळी भागाकरिता पिण्याचे पाणी वाहून नेणार्‍या बहुतांशी टँकरमधून गळती होत असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. इंधन व दुधाच्या टँकरला गळती लागत नाही. मग पाण्याचेच टँकर गळके का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

गेली दोन वर्षे समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. दुष्काळाची सर्वाधिक झळ नगर, पारनेर, जामखेड, कर्जत व र्शीगोंदे तालुक्याला बसली आहे. दुष्काळग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 341 गावे व 1 हजार 384 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. 410 टँकर खासगी, तर 18 प्रशासनाचे आहेत. यापैकी बहुतांश टँकरमधून पाणीगळती होते.

टँकरमधून गळती होत असल्याने मंजूर झालेल्या क्षमतेपेक्षा कितीतरी कमी पाणी गावाला मिळते. गावात जाण्यासाठी अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. शिवाय रस्तेही खराब. त्यामुळे टँकरमधून बरेच पाणी वाया जाते. त्यामुळे वाढीव खेपा कराव्या लागतात. पर्यायाने खर्चही निष्कारण वाढतो आहे. गळके टँकर दुरुस्त करून घेतले, तर प्रशासनाचा कोट्यवधींचा खर्च वाचू शकतो. तथापि, प्रशासनाकडे मागणी करूनही टँकरची दुरुस्ती होत नसल्याचे सरकारचे टँकरचालक सांगतात.

नगर शहरातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. महापालिकेच्या वसंत टेकडी येथील टाकीतून रोज 75 ते 80 टँकर भरले जातात. असे सुमारे साडेसात लाख लिटर पाणी प्रतिदिन शहराबाहेर जाते. शहरातील टंचाईग्रस्त भागात महापालिका खासगी एजन्सीद्वारे टँकरमधून पाणी पुरवते.

गळतीची प्रमुख तीन कारणे आहेत. टँकरमध्ये पाणी भरताना होणारा निष्काळजीपणा, टँकरची उघडी झाकणे व गळके टँकर. पाणी वाहून नेणार्‍या मोठय़ा टँकरची क्षमता 10 हजार, तर लहान टँकरची 5 हजार लिटर असते. पाण्याचा उद्भव जेथे आहेत, त्या परिसरातच बरेच पाणी वाया जाते.

महावितरणकडे जसा वीजगळतीचा हिशेब असतो, तसा पाणीगळतीचा हिशेब जिल्हा प्रशासन आणि मनपाकडे नाही. यापूर्वी पाण्याचे ऑडिट कधी झाले, हेही कुणाला आठवत नाही. पाण्याची नेमकी किती गळती होते, याचा अंदाज कुणालाच नाही. गळतीमुळे किती नुकसान होते, याचा कुठलाही ताळमेळ लागत नाही.

खासगी टँकरच्या तीन खेपांमागे प्रशासनाचा 4 हजार 500 रुपये खर्च होतो. टँकरचे एक दिवसाचे डिझेलसह भाडे यात समाविष्ट आहे. (प्रत्येक टँकरसाठी वेगवेगळे भाडे असू शकते.) जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणीवाटपावर कोट्यवधी खर्च केले आहेत.

ही तर जनतेची क्रूर चेष्टा - ‘‘ दुष्काळी भागात पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही म्हणून टँकरच्या खेपा वाढवल्या जातात. याचा फायदा टँकरमालक व बिले काढणार्‍या यंत्रणेलाच होत आहे. ऐन दुष्काळात जनतेची क्रूर चेष्टा सुरु आहे. किमान टँकरची गळती थांबली, तर वाढीव खेपा नक्कीच कमी होतील व खर्चही वाचेल. टँकरची गळती रोखण्यासाठी चांगला उपाय शोधण्याची नितांत गरज आहे. पण प्रशासनाला या विषयाचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही.’’ अँड. श्याम आसावा, सामाजिक कार्यकर्ते

गळती रोखण्याचा प्रयत्न करू - ‘‘ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे बहुतांशी टँकर खासगी ठेकेदारांचे आहेत. प्रशासनाने पाणीगळती रोखण्याच्या सूचना टंचाई आढावा बैठकीत वारंवार दिल्या आहेत. ठेकेदारांनाही गळती होऊ न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही टँकरमधून पाण्याची गळती होत असेल, तर संबंधित ठेकेदारांना नोटिसा देऊन ‘आधी टँकर दुरुस्त करा, मगच बिले अदा केली जातील’, असे सांगून गळती रोखण्याचा प्रयत्न करु.’’ डॉ. संजीवकुमार, जिल्हाधिकारी