आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्वापाच लाख जनता टँकरवर अवलंबून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मान्सून लांबल्याने जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 233 गावे आणि 1069 वाड्यांवरील 5 लाख 24 हजार 703 लोकसंख्येला 289 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहेत. पावसाअभावी खरीप हंगामही अडचणीत आला आहे.

जिल्ह्यात 2011 व 2012 या वर्षात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी टँकरची संख्या पाचशेच्यावर पोहोचली होती. पशुधन वाचवण्यासाठी चारा डेपो व छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. 2013 मध्ये पुरेसा पाऊस पडल्याने टंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. पण यंदा पुन्हा मान्सूनचा पाऊस लांबल्याने टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिल्हा परिषदेमार्फत चालवण्यात येणा-याबुºहाणनगर, मिरी-तिसगाव, चांदा, तसेच गळनिंब पाणी योजना थकबाकीमुळे वारंवार बंद पडत आहेत. पुढील आर्थिक वर्षात तरतूद केल्याने सध्या या योजना सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत.

नगर शहराला पाणी पुरवणा-यामुळा धरणाची पाणीपातळी खालावली आहे. जून उलटला, तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झालेला नाही. पाऊस लवकर झाला नाही, तर नगर शहराची पाणी योजनाही धोक्यात येण्याची शक्यता आहे. मुळा धरणात साडेचार टीएमसी मृत साठा आहे. आॅगस्टपर्यंत पाऊस न झाल्यास पाणी नियोजन कोलमडून मृत साठ्याला हात लावावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजन आखले आहे. तीव्र पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 233 गावे व 1 हजार 69 वाड्या-वस्त्यांवर 289 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज 776 खेपा करून 5 लाख 24 हजार 703 लोकसंख्येची तहान भागवली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 22 खासगी विहिरी प्रशासनाकडून अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस न झाल्यास टँकरची संख्या साडेतीनशेच्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.

आपत्कालीन आराखडा
- तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने जनावरांसाठी चारा व शेतीसाठी आवश्यक मदत करण्यासाठी संबंधित खातेप्रमुखांना आपत्कालीन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टंचाई निवारणार्थ आवश्यक उपाययोजना करून कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.’’ विठ्ठल लंघे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.
फोटो - डमी पिक