आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजास राजकीय आरक्षणास आमचा विरोध : गोपीनाथ मुंडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - मराठा समाजातील मूठभर नेत्यांचे भले झाले असले, तरी हा समाज अजूनही गरीब व मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळायला हवे, पण राजकारणात आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे, असे प्रतिपादन खासदार गोपीनाथ मुंडे यांनी शनिवारी केले.

सावता परिषदेच्या नंदनवन लॉन येथे झालेल्या दुसर्‍या त्रैवार्षिक अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून मुंडे बोलत होते. याप्रसंगी खासदार दिलीप गांधी, आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले, अनिल राठोड, महापौर शीला शिंदे, मनीषा चौधरी, परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे, अभय आगरकर, भगवान फुलसौंदर, अतुल सावे, प्रताप ढाकणे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल बोरुडे, अंबादास पंधाडे आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, मराठा समाजाला राजकारणात आरक्षण देऊन ओबीसींचे सहकारी बँका, कारखाने व महापालिकांमध्ये असलेले आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. राज्यात ओबीसींची संख्या 62 टक्के आहे, परंतु आरक्षण काढले, तर ओबीसी समाज कधीच निवडून येणार नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच असेल, तर ते नव्याने द्यावे, ते देखील केवळ शिक्षण व नोकरीत. राजकारणात आरक्षण देण्यास आमचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी माळी समाजाने सर्व उपजाती विसरून एकत्र आले पाहिजे. अनेकांना पैसा आणि सत्तेचा माज चढल्याने त्यांचा आपल्या वाणीवरील ताबा सुटला आहे. मुजोरीची भाषा वापरून ते दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहेत. राज्यातील भीषण दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. आमची सत्ता असताना राज्य दिवाळखोरीत काढल्याची टीका करण्यात येत होती. आता मात्र राज्यावर 2 लाख 70 हजार कोटींचे कर्ज झाले आहे, ही दिवाळखोरी नाही का, असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला.

शहरात पेरले ते देशात उगवते

नगर शहरात जे पेरले जाते, ते संपूर्ण देशात उगवते. त्यामुळे माळी समाजाचे शहरात झालेले दुसरे त्रैवार्षिक अधिवेशन महत्त्वाचे आहे. मला वेळोवेळी निवडून देण्यात माळी समाजाचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या समाजासाठी जेवढे करता येईल, तेवढे करणार आहे. मुंडे हे जनसामान्यांचे नेते आहेत. त्यामुळेच ते तळागाळापर्यंत जाऊन काम करत असल्याचे यावेळी आमदार राठोड यांनी सांगितले.


समाजाचे सहा आमदार
राजकारणात स्थान मिळत नसल्याने माळी समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सध्या समाजाचे फक्त 6 आमदार आहेत, त्यापैकी दोघे बापलेक आहेत. त्यामुळे समाजाचा दबावगट जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत आमदारांची संख्या वाढणार नाही. सावता परिषदेची स्थापना होऊन 6 वर्षे झाली, आतापर्यंत 22 जिल्ह्यांत संघटना पोहोचली आहे. त्यामुळे भविष्यात माळी समाजाच्या आमदारांची संख्या वाढल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी व्यक्त केला.