आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई रुग्णालयात जन्मास येणाऱ्या कन्येचे चांदीचे नाणे देऊन स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- श्री साई समाधी शताब्दी वर्षात शिर्डीच्या साई संस्थान रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलींच्या कुटुंबास २० ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार अाहे. येथील शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत अाहे. गुरुवारी लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, धनश्री सुजय विखे व नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्या हस्ते गुरुवारी जन्माला आलेल्या मुलींच्या कुटुंबाला चांदीचे नाणे देऊन गौरवण्यात आले.  

१ आॅक्टोबर २०१७ ते १८ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबवला जात अाहे. या अभिनव उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ‘शिलधी’चे संस्थापक राजेंद्र कोते, अध्यक्ष तुषार शेळके, साई जोरी, योगेश गोरक्ष, दीपक वारुळे, विजय अप्पासाहेब कोते, संतोष ढेमरे, सुदेश शिंदे, प्रमोद पवार, संजय भावसार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शिर्डीचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. संतोष गोंदकर यांचा रूबल अग्रवाल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.  

या कार्यक्रमाच्या अगोदर शिलधी प्रतिष्ठानतर्फे श्री साईनाथ रुग्णालयात रुग्णांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले.  शिर्डीत नेहमीच विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शिलधी प्रतिष्ठानतर्फे ‘लेक वाचवा अभियान’ राबवण्यात येत आहे. तसेच साईरत्न पुरस्कार वितरण समारंभही केला जातो.  

मुलगी ही लक्ष्मीच  
आज स्त्रीजन्माचे स्वागत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करण्यात आले. घरात नवीन जन्माला येणारी मुलगी ही खऱ्या अर्थाने लक्ष्मीच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. साईनाथ रुग्णालयात वर्षभरात जन्माला आलेल्या  मुलीला एक चांदीचे नाणे देऊन  बाळाच्या आईचा व मुलीचा गौरव करण्यात येणार आहे.  
- राजेंद्र कोते, अध्यक्ष, शिलधी प्रतिष्ठान, शिर्डी
बातम्या आणखी आहेत...