आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयांना 2 लाखांचा विमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- देशात शेतमजुरांनंतर बांधकाम क्षेत्रात काम करणा-यांची संख्या 4 कोटींच्या आसपास आहे. या सर्व कामगारांसाठी शासनाने कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. कोणतीही इमारत मंजूर होताना शासनाकडे कामगारांच्या कल्याणासाठी एक टक्का सेस कापला जातो. त्याचे हजारो कोटी रुपये कामगारांच्या कल्याणासाठी पडून आहेत. त्याचा फायदा सर्व कामगारांनी घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी नुकतेच केले.
जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगार मंडळाचे सभासद असलेल्या कामगारांचा मेळावा नुकताच मार्केट यार्डमधील हमाल पंचायत भवनात पार पडला. सुरुवातीला जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडात बळी गेलेल्या संजय जाधव, जयश्री जाधव व सुनील जाधव, तसेच दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक आढाव होते.
इमारत बांधकाम कामगारांना मंडळाचे सभासद होऊनदेखील मंडळाच्या विविध लाभांबाबत कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे कामगार या योजनेपासून वंचित रहात आहेत. त्यामुळे बांधकाम कामगारांना मंडळाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांची, प्रामुख्याने आरोग्य विमा मार्गदर्शन होण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हमाल मापाडी संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव घुले यांनी यावेळी दिली. यावेळी सहायक कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सहायक कामगार आयुक्तांनी कामगारांना लागू असलेल्या लाभाविषयी मार्गदर्शन करून कामगारांच्या उपस्थितीत केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. या मेळाव्याला मेडिकेअर टीपीओ सर्व्हिसेस इंडियाचे औरंगाबाद विभागाचे प्रशांत नाईकवडे यांनी उपस्थित कामगारांना व उपस्थित डॉक्टरांना टीपीओंतर्गत लाभ कसा मिळवावा, याबाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे यांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे सभासद असलेल्या कामगारांना आरोग्य विम्याची माहिती दिली. मेळाव्याच्या यशस्विततेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष भारत भूषण यांनी विशेष परिश्रम घेतले. खजिनदार पौलस भिंगारदिवे यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन करून आभार मानले. मेळाव्याला कॉम्रेड बाबा आरगडे, सरचिटणीस नंदू डहाणे, शहेनाज शेख आदी उपस्थित होते.