आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western Water Turn To Nagar District Yashwantrao Gadakh

नगर जिल्ह्याकडे पश्चिमेचे पाणी वळवा - यशवंतराव गडाख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- राज्यात नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यात नेहमीच कमी पाऊस होत असल्याने आहे तेवढय़ाच पाण्यासाठी आपण भांडणं करतो. यावर पर्याय म्हणून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी या जिल्ह्यांकडे वळवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष करून सरकारवर दबाव वाढवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.

जिल्हा सहकारी बँकेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवारी सहकार सभागृहात बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी गडाख बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष उदय शेळके, सीताराम गायकर, पांडुरंग अभंग, रामदास वाघ आदी उपस्थित होते.

गडाख म्हणाले, सहकारात सरकारचा हस्तक्षेप वाढल्यामुळे राजकारण सुरू झाले. मात्र, 97 व्या घटना दुरुस्तीने स्वायत्तता दिली. अनेक निर्णयाचे अधिकार सर्वसाधारण सभेला आहेत. आज बँकेची परिस्थिती चांगली असली तरी पुढील वर्षी अडचण होईल. कारण पाऊस नसल्याने पुढील वर्षीसाठी ऊस नाही. याचा परिणाम वसुलीवर होण्याची शक्यता आहे. आतापासून काटकसर केल्यास येणार्‍या परिस्थितीला तोंड देता येईल.

नगर, नाशिक, बीड, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी होतो. त्यामुळे पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी येथे आणल्याशिवाय पर्याय नाही. उपलब्ध असलेल्या पाण्यासाठी भांडण्यापेक्षा सर्वांनी सरकारवर दबाव आणून पश्चिमेचे पाणी वळवावे. जर हे पाणी जिल्ह्याकडे वळाले, तर सुमारे 125 टीएमसी पाणी मिळेल. दूध व पाणी हे जिल्ह्याचे अर्थकारण आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी, असे गडाख म्हणाले. बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

खेमनर म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये सर्वत्र समान नियम कार्यपद्धती असावी या हेतुने केंद्र सरकारने 97 वी घटाना दुरुस्ती केली आहे. सरकारने अनुषंगिक बदल करण्यासाठी दुरुस्तीचा अध्यादेश जारी केला आहे, असे खेमनर म्हणाले.
पाण्यासाठी परिषद घ्यावी

पश्चिमेतले पाणी जिल्ह्याकडे वळवण्यासाठी तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत एका परिषदेचे आयोजन करावे. या परिषदेला सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यात पाणी वळवण्यासंदर्भात विचारविनिमय करता येईल, असे गडाख यांनी सांगितले.

2 हजार 456 कोटींचे कर्ज
जिल्हा सहकारी बँकेचे भागभांडवल 129 कोटी, निधी 389 कोटी, ठेवी 4 हजार 32 कोटी आहेत. नाबार्डकडून घेतलेल्या 335 कोटींचे कर्ज घेतले आहे. तसेच 2 हजार 456 कोटींचे कर्ज येणे बाकी आहे. त्यामुळे बँकेची स्थिती भक्कम असल्याचे दिसून येते.