नगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामात अकार्यक्षम ठरल्याचा ठपका ठेवत जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नोटीस बजावली आहे. दरम्यान, राज्याच्या ग्रामविकासमंत्री मुंडे गुरुवारी (१६ जून) नगर जिल्ह्यातील कृषी विभागाचा आढावा घेणार आहे. त्यात बऱ्हाटे यांच्याबाबत मुंडे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनेवर वैयक्तिक मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. कृृषिराज्य मंत्री राम शिंदे यांच्या जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यावर अकार्यक्षमतेवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना जिल्हाधिकारी कवडे यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावली आहे. जिल्ह्यात २७९ गावांमध्ये जलयुक्त अभियान राबवण्यात येत आहे. अभियानासाठी निवडलेल्या गावांपैकी केवळ १०० गावांमध्येच १०० टक्के कामे झाली आहेत. गुरुवारी मंत्री मुंडे नगर दौऱ्यावर येत आहेत. त्या कृषी विभागाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. या आढावा बैठकीत बऱ्हाटे यांच्याबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.