आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनाथांची सेवा करताना मी माय झाले: सिंधुताई सपकाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अनाथांचीसेवा करताना मी माय झाले अन् तुम्ही माझे गणगोत झालात, असे भावनिक उद्गार ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी नुकतेच काढले. नगर येथील स्व. जिजाबाई साळुंके यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आदर्शमाता पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास जंगले महाराज शास्त्री, अनिल साळुंके, बबनराव गांधाक्ते, डॉ. अरुण साळुंके, राहुल साळुंके, रोहित साळुंके, उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, जिल्हा परिषद सदस्य राजाराम एरंडे आदी यावेळी उपस्थित होते. सपकाळ म्हणाल्या, देश-विदेशांत वेळोवेळी माझा सन्मान झाला. माझ्यावर चित्रपट निघाला. अनेकांपर्यंत माझे कार्य पोहोचले. अनाथांची सेवा करता-करता मी त्यांची माय झाले आणि तुम्ही माझे गणगोत झालात. समाजकार्याचा घेतलेला वसा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आदर्श माता कस्तुराबाई पाचे, आनंदाबाई एरंडे सुगंधाबाई जाधव यांना सपकाळ यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कस्तुराबाईंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी करून तीन मुले दोन मुलींना मोठे केले. त्यांनी बांधकाम, तसेच कापड व्यवसायात मोठे नाव कमावले आहे. आनंदाबाईंनी संघर्षमय जीवनातून वाटचाल करत मुलांना शिक्षण दिले. त्यांचा मुलगा राजाराम एरंडे जिल्हा परिषद सदस्य आहे. दुसरे चिरंजीव बांधकाम व्यावसायिक आहेत. सुगंधाबाईंनी हलाखीच्या परिस्थितीत आपल्या मुलांना शिकवले. त्यांचे चिरंजीव डॉ. सदानंद जाधव हे नगरमध्ये तीन वर्षे निवासी उपजिल्हाधिकारी होते. ते सध्या मुंबईत कार्यरत आहेत. या तिन्ही मातांचा गौरव करून जंगले महाराज शास्त्री म्हणाले, मातृत्व श्रेष्ठ आहे. मातेचे महत्त्व कमी होता कामा नये.

आदर्श माता पुरस्कारांचे वितरण करताना ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ. समवेत जंगले महाराज शास्त्री, अरुण साळुंके, रोहित साळुंके आदी मान्यवर.
कृतज्ञता
बातम्या आणखी आहेत...