आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Are Responsible For Narendrasingh Sabarwal Death ?

नरेंद्रसिंग सबरवाल यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : नरेंद्रसिंग सबरवाल
नगर - अजवड वाहतुकीला शहरात कायमची प्रवेशबंदी असुनही ही वाहने सर्रास नियम धुडकावून शहरात प्रवेश करत आहेत. मंगळवारी दुपारी नगर-पुणे रोडवर झालेल्या अपघातामुळे हे पुन्हा अधोरेखित झाले. स्वस्तिक चौकात अवजड वाहनाने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार नरेंद्रसिंग सतनामसिंग सबरवाल (५१, स्टेशन रोड) हे जागीच ठार झाले. नागरिकांनी अवजड वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसाच्या निलंबनाची मागणी केली. पोलिसांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात घेतल्यावर वाहतूक सुरळीत झाली. मात्र, नरेंद्रसिंग सबरवाल यांच्या अपघाती मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.
सबरवाल यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, अविवाहित मुलगा मुलगी असा परिवार आहे. त्यांचे वाडिया पार्कमध्ये गोविंद ऑटोमोबाईल्स नावाचे दुकान आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुकान बंद करुन ते दुचाकीवरुन स्टेशन रस्त्यावर असलेल्या घरी जात होते. स्वस्तिक चौकाजवळ हॉटेल सगमसमोर आल्यानंतर भरधाव वेगाने जाणाऱ्या अवजड वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे सबरवाल रस्त्यावर आदळून जागीच झार झाले. अपघातानंतर अवजड वाहनचालक पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. पण, नागरिकांनी पाठलाग करुन त्याला सक्कर चौकात पकडले.

अपघाताचे वृत्त शहरात पसरल्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. शिवसेनेच्या अाशा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरु झाले. त्यामुळे नगर-पुणे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. कोतवालीचे पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक पाडळकर आदींसह पोलिसांचा मोठा फौजफाटा काही वेळातच घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत नागरिकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या अवजड वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. स्वस्तिक चौकात वाहतूक पोलिस उपस्थित नसल्यामुळेच अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला.

वाहतूक पोलिसावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी आंदोलकांची मागणी होती. आंदोलन मागे घेण्याची विनंती करुनही आंदोलक मागणीवर ठाम होते. याप्रकरणी चौकशी करुन संबंधित पोलिसावर कडक कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. तासाभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. सबरवाल यांचे शहरातील पंजाबी समाजात चांगली ओळख होती. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. वाडिया पार्कमधील गाळेधारकांच्या समस्या साेडवण्यासाठी ते आघाडीवर होते. त्यामुळे त्यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजल्यानंतर शहरात सर्वत्र शोककळा पसरली. प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. अवजड वाहतुकीला प्रवेश बंदीची अंमलबजावणी करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, हलगर्जीपणा करणारे वाहतूक पोलिस, अन् बेशिस्त वाहनचालक, यांपैकी सबरवाल यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? याचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.

महापौर कळमकरही रस्त्यावर
वारंवारपाठपुरावा करुनही स्टेशन रस्त्यावर उड्डाणपूल झालेला नाही. करवसुली मात्र सुरुच आहे. त्यामुळे अभिकर्ता चेतक एंटरप्रायजेस, दफ्तर दिरंगाई करणारे, उड्डाणपुलाचे काम होऊ देणारे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रणात हलगर्जीपणा करणारे पोलिस, या सर्वांची चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशा मागणीचे निवेदन महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २०० ते २५० जणांच्या जमावाने पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले. उद्योजक हरजीतसिंग वधवा यांनीही पोलिसांकडे आग्रही मागणी नोंदवताना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प
शिवसेनामहिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे रोडवर तात्काळ रास्तारोको आंदोलन सुरु झाले. सबरवाल यांच्या मृत्यूचे खापर वाहतूक पोलिसावर फोडत आंदोलकांनी पोलिसाच्या निलंबनाची मागणी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित झाले. अवजड वाहने स्टेशन रस्त्यावर अजून किती बळी घेणार, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या अपघाताला सर्वच शासकीय विभाग कारणीभूत आहेत. त्यामुळे दोषी पोलिसासह इतरांवर कारवाई झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा आशा निंबाळकर यांनी दिला आहे.

हेल्मेट असते तर वाचले असते
स्टेशनरस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. त्यात बेशिस्त वाहतुकीची भर पडते. अशा परिस्थितीत दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालून वाहन चालवणे गरजेचे आहे. न्यायालयाने हेल्मेटसक्ती केलेली आहे. पण, पुण्या-मुंबईसारख्या शहरातही हेल्मेटसक्तीला कडाडून विरोध झालेला आहे. नगरमध्ये तर वाहतुकीचे नियम पाळणे म्हणजे असभ्यतेचे लक्षण समजले जाते. नरेंद्रसिंग सबरवाल हे मोटारसायकलवरुन घरी निघाले, तेव्हा त्यांनी हेल्मेट घातलेले नव्हते. त्यांनी जर हेल्मेट घातले असते, तर किमान त्यांचा जीव वाचला असता अशी हळहळ घटनास्थळी उपस्थित गर्दीमध्ये व्यक्त होत होती.