आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Guard The Protected Historic Monument ?

संरक्षित ऐतिहासिक स्मारकांची कोण रखवाली करणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद विभागात कायम कर्मचार्‍यांपेक्षा रोजंदारीवरील कर्मचार्‍यांचीच संख्या जास्त आहे. अनेक ऐतिहासिक वास्तूंची देखभाल रोजंदारीवरील कर्मचार्‍यांच्या भरवशावरच होते. आता या कर्मचार्‍यांनीच 11 फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा इशारा दिल्याने ऐतिहासिक संरक्षित वास्तूंना वाली कोण, असा प्रश्न निर्माण होणार आहे.
औरंगाबाद सर्कलमध्ये वेरूळ, अजिंठय़ासारख्या जागतिक वारसास्थळांचा समावेश आहे. हजारो पर्यटक दररोज या स्थळांना भेट देतात. मात्र, अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे या स्थळांची दैनंदिन देखभालही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे बहुतेक संरक्षित वास्तूंसाठी रोजंदारीवरील कर्मचारी भरण्यात आले आहेत. मागील वीस वर्षांपासून ही स्थिती आहे. 1985 ते 89 आणि नंतर 1998 ते 2005 या काळात नाममात्र कर्मचारी भरती करण्यात आली. 40-45 रोजंदारी कर्मचार्‍यांना चौकीदार म्हणून घेण्यात आले. अनुकंपा तत्त्वावर सात जणांना शासकीय सेवेत घेण्यात आले. उर्वरित कर्मचारी मात्र वर्षानुवर्षे रोजंदारी काम करत आहेत. महिन्यातून 26 दिवस केवळ 259 रुपये मजुरी त्यांना मिळते. कोणतेही शासकीय लाभ त्यांना मिळत नाहीत. साधे ओळखपत्रही त्यांना देण्यात आलेले नाही.
औरंगाबाद सर्कलमधील काही संरक्षित स्मारकनिहाय शासकीय कर्मचारी संख्या (कंसात रोजंदारीवरील कर्मचारी संख्या) दौलताबाद - 10 (28), वेरूळ - 18 (35), अजिंठा - 22 (42), बीबी का मकबरा - 18 (36). नगर जिल्ह्यात 5 शासकीय व 14 रोजंदारी कर्मचारी आहेत. नाशिक, नागपूर, चंद्रपूरला अशीच स्थिती आहे. नागपूरमध्ये अवघे दोन शासकीय कर्मचारी आणि 15 रोजंदारीवरील कर्मचारी आहेत. ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व लक्षात घेता सध्याच्या रोजंदारीवरील कर्मचार्‍यांची संख्याही कमी आहे. संध्याकाळनंतर अनेक वास्तू बेवारसच असतात.
रोजंदारीवरील कर्मचार्‍यांनी प्रथमच आंदोलनाचा पवित्रा घेत शासकीय सेवेत न घेतल्यास 11 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हे कर्मचारी संपावर गेल्यास अनेक ऐतिहासिक वास्तूंना कोणी वाली राहणार नाही. अनेक वास्तूंची सध्या दुरवस्था असून काही ठिकाणी चोर्‍याही होत आहेत. चौकीदार नाही असे दिसताच समाजकंटकांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे.
भिंगारचे जैन मंदिर यादीत ?
पुरातत्त्व विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरील यादीत नगर शहर व परिसरातील दमडी मशीद, न्यामतखानी दरवाजा, बारा इमाम कोटला, मक्का मशीद, दो बोटी चिरा, बागरोजा, सलाबतखान मकबरा, तसेच भिंगार कॅन्टोन्मेंटमधील जैन मंदिराचा समावेश आहे. प्रत्यक्षात असे कोणतेही मंदिर पुरातत्त्वच्या ताब्यात नाही. ज्या वास्तूवर अलीकडेच लाखो रुपये खर्च करण्यात आले, त्या फराहबख्क्ष महालाचा समावेश मात्र या यादीत नाही.
पुरातत्त्व विभागाकडील रोजंदारीवरील कर्मचार्‍यांबाबत स्थानिक पातळीवर आम्ही निर्णय होऊ शकत नाही. दिल्लीतच याबाबत काय ते ठरेल. हे कर्मचारी संपावर गेल्यास पर्यायी व्यवस्था काय करायची याचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून अजून मिळालेले नाहीत. आदेश आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. तूर्त काहीही ठरलेले नाही. ’’ एम. पी. पवार, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग, अहमदनगर.