आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Did Pichad And Thorat Keep Mum? Radhakrishna Vikhe

कायदा होताना पिचड, थोरात गप्प का होते ? राधाकृष्ण विखे यांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहाता - जिल्ह्यातील हक्काच्या पाण्यासाठी मंत्री असतानाही ठाम भूमिका घेऊन संघर्ष सुरू केला. तेव्हा जिल्ह्यातील मंत्री तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सल्ला देत आपली राजकीय पोळी भाजून घेत होते. पाण्याच्या प्रश्नांवर एकमेकांशी मिलीभगत करणारे पिचड, थोरात समन्यायी पाणीवाटप कायदा होताना मंत्री असूनही गप्प का बसले, असा सवाल करतानाच राज्यातील पुढाऱ्यांच्या नादी लागून पाणीप्रश्नांच्या राजकारणाला ही मंडळी बळी पडल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ६६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विखे बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. भास्कर खर्डे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, नंदू राठी, कार्यकारी संचालक आबासाहेब निबे आदी उपस्थित होते.

विखे म्हणाले, राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत आपण राज्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत. बाकी मंडळी तालुका सोडायला कोणी तयार नाही. सरकारच्या विरोधात बोलायलाही कोणी तयार नाहीत. हीच मंडळी आता जिल्ह्यातील पाणीप्रश्नाचे भांडवल करून टाहो फोडू लागली आहेत. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जिल्ह्याच्या हक्काचे पाणी जायकवाडीला सोडण्याच्या मुद्यावरून आपण मंत्रिपदाच्या राजीनाम्याची तयारी ठेवली होती. पाणी सोडण्याचा पायंडा पडू नये म्हणून थोरात आणि पिचड यांना बरोबर घेऊन तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे गेलो. केवळ विखेंची जिरवायची म्हणून काहींनी, तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही पाणीप्रश्नावर सल्ला देण्यास सुरुवात केली होती. थोरात, पिचडांचे मतदारसंघ हे नदीच्या काठावर आहेत. कालव्यांवर असलेल्या आपल्या मतदारसंघातील लोकांचा रोष आमच्याविरोधात वाढण्यासाठीच पाण्याचे हे राजकारण रचण्यात आल्याचा गौप्यस्फोट विखे यांनी केला. समन्यायी पाणीवाटप कायदा होताना जागतिक बँकेचे पैसे मिळणाऱ्या धरणांची अपूर्ण कामे पूर्ण होणार, असे सांगितले गेले. याच मुद्यावर आपण जिल्ह्यातील जिरायती पट्ट्यातील निळवंडे धरणाला निधी मिळावा. पश्चिम वाहिनीच्या पाण्याचे सर्वेक्षण व्हावे, अशा मागण्या मान्य करून घेण्यास सुचवले होते. पण जिल्ह्यातील पुढाऱ्यांमध्ये पाणीप्रश्नांवरून भांडणे सुरूच रहावी, ही भूमिका राज्यातील काही पुढाऱ्यांनी घेतल्याने त्यास शेजारील तालुक्यातील आमचे मित्र बळी पडले. पद्मश्रींच्या जयंतीला मुख्यमंत्री फडणवीस प्रवरानगरला आले. शेतकरी दिनाचे ते औचित्त्य होते. ते माझ्या सत्काराला आले नव्हते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी मागील आर्थिक वर्षातील ताळेबंद सादर केला. कार्यक्षेत्रातील लाख ५० हजार नागरिकांचा पाच वर्षांचा विमा उतरून हप्त्यांची रक्कम जनसेवा फाउंडेशन भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विखे पाटील कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे.

केवळ प्रवरेवर टीका करण्याचा काहींचा धंदा
माझ्याविरोधात निवडणुकीत ज्यांनी काम केले. ती माणसं इतिहास विसरतात. संगमनेर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री विखे होते. हा इतिहास तुम्ही कसा नाकारता. केवळ प्रवरेवर टीका करण्याचा धंदा काहींनी मांडला आहे. पण या टीकेतून चांगले काम करण्याची प्रेरणाच आम्हाला मिळते, अशा उपरोधिक शब्दांत विखे यांनी बाळासाहेब थोरातांचा समाचार घेतला.

आगामी ग्रामसभांत संपूर्ण कर्जमाफीचा ठराव करा
येत्याऑक्टोबर रोजी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभांमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफ, दुधाला ३५ रुपये प्रतिलिटर भाव, विद्यार्थ्यांची फी माफी, एफआरपीसाठी अनुदान देण्याच्या मागणीचे ठराव करून सरकारला पाठवावेत. समाजाचा दबाव जोपर्यंत सरकारवर येत नाही, तोपर्यंत झोपी गेलेले सरकार जागे होणार नाही, असा घणाघात विरोधी पक्षनेते विखे यांनी केला.