संगमनेर- दोन कुटुंबांत झालेल्या भांडणात घुलेवाडीत तीस वर्षांच्या तरुणाला जीव गमवावा लागला. किरण कचरु कदम असे त्याचे नाव आहे. सोमवारी रात्री झालेल्या या खूनप्रकरणी भारत दिलीप शिंदे आणि त्याची पत्नी रेश्माविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
साठेनगरमध्ये हा प्रकार घडला. आरोपीच्या मुलाने छाया कदम हिच्या मुलीशी भांडण करत तिला मारहाण केली. छायाने याचा जाब विचारत रेश्मा शिंदे हिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास छाया वस्तीतील सार्वजनिक शौचालयात गेली असता तेथे रेश्माने तिच्याकडे पहात तुझी मुलगी अप्सरा लागली काय, असे म्हणत वाद घातला.
छायाचा पती किरण तेथून जात होता. त्याने याबाबत विचारणा केली असता पत्नीने त्याला दुपारी झालेल्या प्रकाराची माहिती दिली नंतर किरणने आरोपीच्या घरी जात रेश्माला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. रेश्माने किरणची गचांडी पकडत त्याला शिवीगाळ केली. रेश्माचा पती भारत यानेही त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भारतची लाथ किरणच्या पोटाखाली लागल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. जमलेल्या लोकांनी किरणला घरी नेले. तेथून त्याला रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.