आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला जाळून मारणार्‍याला पतीला जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पत्नीला जाळून ठार मारल्याप्रकरणी दोषी आढळलेला अशोक दशरथ मातंग (नाशिक) याला जिल्हा न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 15 एप्रिल 2012 रोजी शेवगावमध्ये ही घटना घडली होती.

रेखा शंकर पवार हिचा विवाह सात वर्षांपूर्वी अशोकशी झाला होता. नोकरीनिमित्त ती माहेरी शेवगाव येथेच असे, तर अशोक नाशिकला राहत होता. महिना-पंधरा दिवसांतून तो शेवगावला यायचा. 14 एप्रिल 2012 रोजी नेहमीप्रमाणे तो आला. दुसर्‍या दिवशी दारू पिऊन त्याने रेखाकडे पैशांची मागणी केली. रेखाने पैसे देण्यास नकार दिला. दुपारी एकच्या सुमारास घरी येऊन त्याने पुन्हा पैसे मागण्यास सुरूवात केली. रेखाने नकार देताच त्याने शिवीगाळ करून रॉकेलचा ड्रम तिच्या अंगावर रिकामा केला व काडी ओढून त्याने पेटवून दिले. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून रेखाचा भाऊ महेश पवार धावत आला. आग शमवून रेखाला शेवगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी रेखाचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानुसार शेवगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या खटल्याची सुनावणी न्यायाधीश शिंदे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्या वतीने 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रमोदकुमार जैन, अमित सरदेसाई, माधुरी शिरसाठ व सुजाता राठोड या डॉक्टरांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाचा साक्षीपुरावा ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे यांनी बाजू मांडली.