आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परस्पर सौहार्द, सामंजस्य वाढवण्यासाठी ‘विकासपीडिया’ उपयुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - समाजातील गैरसमज दूर होऊन परस्पर सौजन्य, सौहार्द आणि सामंजस्य वाढवण्यासाठी ‘विकासपीडिया’ या माध्यमाचा उपयोग होऊ शकतो, असे कृषी आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले.

भारत सरकारच्या विकासपीडिया या वेबपोर्टलच्या सहभागीय माहिती निर्मिती व संकलनातून सामाजिक विकासाकडे या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा मंगळवारी पुण्यातील यशदा संस्थेत झाली. या कार्यशाळेचे आयोजन वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट व प्रगत संगणक विकास केंद्र, हैदराबाद यांनी केले. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना दांगट बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशदाचे उपमहासंचालक डॉ. के. एम. नागरगोजे उपस्थित होते. विकासपीडियाच्या वाटचालीत ज्या संस्थांनी साथ दिली, अशांचा सत्कार दांगट यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

विकासपीडिया हे पोर्टल राष्ट्रीय स्तरावरील इंडिया डेव्हल्पमेंट गेटवे या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून विकसित करण्यात आले आहे. सामाजिक विकासाच्या प्रगतीसाठी असलेले हे वेब पोर्टल भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभाग, संगणक विकास केंद्रातर्फे कार्यान्वीत केले जाते. या पोर्टलसाठी राज्यस्तरीय मध्यवर्ती संस्था म्हणून वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट ही संस्था काम करते.
दांगट म्हणाले, मराठी माणसाला आपल्या भावना, विचार, संकल्पना आपल्या भाषेतून व्यक्त करण्याची चांगली संधी विकासपीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे.

डॉ. नागरगोजे म्हणाले, आजच्या जगामध्ये माहितीचा विस्फोट झाला आहे. माहिती तंत्रज्ञान घराघरात येऊन पोहोचले आहे. विकासपीडियाच्या माध्यमातून ही माहिती मराठीतून लोकांपर्यंत पोहोचणार आहे, ही बाब अभिमानास्पद आहे.

प्रास्ताविक वॉटरशेडचे अनिरुद्ध मिरीकर यांनी केले. वॉटर संस्थेचे कार्यकारी विश्वस्त क्रिस्पिन लोबो व सी-डेकचे डॉ. कथरीसन यांनी विकासपीडियाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. अतुल पगार यांनी विकासपीडिया पोर्टलच्या ठळक वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली. कार्यशाळेतील सहभागी सदस्यांनी कृषी, आरोग्य, शिक्षण, उर्जा, समाजकल्याण व ई - शासन या विभागासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. चर्चेचे सूत्रसंचालन नीलिमा जोरवर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित कवठेकर यांनी केले.
शेतकर्‍यांसाठी उपयुक्त माहिती
कृषी विभागात जागतिक, तसेच देश पातळीवर जे नवीन बदल होत आहेत, नवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान शेतीमध्ये येत आहे, ते शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले पाहिजे. ती काळाची गरज आहे. शेतीमध्ये बाजारपेठेच्या व्यवस्थापनाची गरज आहे. ग्राहक आणि शेतकरी यांच्या समन्वय विकासपीडियाच्या माध्यमातून साधला गेला पाहिजे, असे कृषी आयुक्त दांगट म्हणाले.
फोटो - वॉटरशेड आॅर्गनायझेशन ट्रस्ट व सी-डॅकतर्फे यशदामध्ये आयोजित कार्यशाळेचे उदघाटन कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते झाले. यावेळी यशदाचे उपमहासंचालक डॉ. के. एम. नागरगोजे, सी-डॅकचे डॉ. कथरीसन, वॉटरशेडचे क्रिस्पिन लोबो, अनिरूद्ध मिरीकर आदी उपस्थित होते.