आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पावसाने नगरला झोडपले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहराला सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर चाललेल्या या पावसामुळे अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या. त्यामुळे संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
शहरातील सावेडी, पाइपलाइन रस्ता, भिंगार, नागापूर, केडगाव या भागात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. सगळे रस्ते जलमय झाले. खड्डय़ांत पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल झाले. वादळी पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. न्यू आर्टस् महाविद्यालय, जिल्हा परिषद, कोतवाली पोलिस ठाणे, तसेच बाळासाहेब देशपांडे रुग्णालय परिसरातील झाडे पडली. काही ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने तारा तुटल्या. समतानगर परिसरातील पंकज कॉलनीत अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. वारुळाचा मारुती मंदिर परिसरातील काही घरांचे पत्रे उडाले.
माणिकदौंडी परिसरात गारांसह पाऊस
पाथर्डी तालुक्यातही वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. वादळामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडली. अनेक घरांची पत्रे उडाली आहेत. माणिकदौंडी परिसरात गारांसह पाऊस झाला. अकोला, धायकतडकवाडी, मोहटे, टाकळीमानूर, शेकटे, फुंदे टाकळी, कोरडगाव, तिसगाव, करंजी, देवराई, मांडवे, निवडूंगे, खरवंडी, धामणगाव येथे जोरदार पाऊस झाला. अकोले शिवारात मेंढपाळ शिवाजी आर्शूबा गज्रे यांच्या शेजारी वीज पडल्याने त्यांचा रक्तदाब वाढला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, या पावसामुळे ऊस, भुईमूग, भाजीपाला व चारापिकास जीवदान मिळाल्याने शेतकर्‍यांची चिंता मिटली आहे. मशागतीच्या कामाला वेग येणार आहे.
वादळात झाडे पडल्याने नगर-पाथर्डी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक चिंचपूर रस्त्याने वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमराईजवळही झाड पडल्याने रस्ता बंद झाला. रामगिरीबाबा टेकडीजवळ झाड पडून शहरातील वीज पुरवठा खंडित झाला.