आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी तडाख्याने दाणादाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर शहराला सोमवारी रात्री वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह सुमारे दीड तास चाललेल्या या पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बोल्हेगाव येथे पत्रे उडून अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. अनेक भागात विजेचे खांब कोसळल्याने शहरासह उपनगरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. मागील 24 तासांत पाथर्डी - 31, नगर - 28, राहुरी - 1, कर्जत - 1, र्शीगोंदे - 4 व जामखेड - 8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संगमनेर, कोपरगाव, र्शीरामपूर, नेवासे, अकोले या तालुक्यांत मात्र पावसाची नोंद नाही. बोल्हेगावात वादळात उडालेले पत्रे अंगावर पडल्याने बबन रानबा गाडे (48) यांचा मृत्यू झाला. त्यांचे भाचे कैलास जाधव किरकोळ जखमी झाले. लांडे मळा येथेही घरावरील पत्रे उडाले. निंबळक येथे एका घराचे शेड उडाले.
नगर शहराच्या मध्यभागासह सावेडी, भिंगार, नागापूर, केडगावमध्ये सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे नगरकरांची मोठी तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे पत्त्यासारखे उडाले, भिंती कोसळल्या. नगर-औरंगाबाद रस्त्यावर दोन विजेचे खांब कोसळले. र्शीराम चौक, शीलाविहार, भिंगार, सावेडी, सबजेल चौक येथे मोठी झाडे पडली. पोलिस परेड मैदान परिसरातही एक झाड कोसळले. सिध्दिबागेतील झाडांच्या फांद्या तुटल्या. गुलमोहर रस्त्यावर एका घरासमोरील 7-8 झाडे वादळात आडवी झाली. भिंगार, वाडिया पार्क, माळीवाडा, लालटाकी, गाडळकर मळा येथील काही घरांचे पत्रे उडाले. रस्त्याच्या कडेला लावलेले अनेक होर्डिंग वादळात फाटले.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. आयुर्वेद रस्त्यावर खड्डय़ात ट्रक अडकून पडला होता. वारुळाचा मारुती परिसरातही वादळामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. महापौर संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, शरद ठाणगे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांसह मंगळवारी या भागाची पाहणी केली.

मागील आठवड्यात जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे 110 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. 269 घरांची पडझड झाली. 42.46 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. वादळी पावसात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये पाचजणांचा बळी गेला आहे.